लोहगाव विमानतळावर महिलेसह दोघांना पकडले

जेवणाच्या डब्यात एक कोटी तीस लाख रुपयांचे परकीय चलन दडवून दुबईला निघालेल्या महिलेसह एकाला लोहगाव विमानतळावर केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने पकडले.  त्यांच्याकडून युरो आणि अमेरिकन डॉलर असे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी भारतीय कस्टम कायदा आणि फेमा (परकीय चलन विनिमय कायदा)अंतर्गत निशांत विजय येताम (रा. नागोठाणे, जि. रायगड) आणि हर्षां रंगलानी राजू (रा. चेंबूर, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत आणि हर्षां हे रविवारी (६ ऑगस्ट) एअर इंडियाच्या विमानाने दुबईला निघाले होते. लोहगाव विमानळावर कस्टमच्या पथकाला संशय आल्याने निशांत आणि हर्षां यांच्याकडील सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या चार खानी जेवणाच्या डब्यात उपमा ठेवल्याचे आढळून आले. डब्याची अंतर्गत रचना संशयास्पद वाटल्याने कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा तपासणी केली, तेव्हा चार पुडय़ाच्या डब्याच्या खालील बाजूस असलेल्या कप्प्यात परकीय चलन शिताफीने दडविल्याचे उघडकीस आले. कस्टमच्या पथकाकडून दोघांना ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. विशेष न्यायालयाने त्यांना चौदा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कस्टमच्या पथकाकडून दोघांची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती कस्टमचे आयुक्त व्ही. एस. चौधरी यांनी दिली.

थर्मासला सोन्याचे आवारण

कस्टमच्या पथकाकडून वर्षभरापूर्वी दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून थर्मास जप्त करण्यात आला होता. प्रवाशांनी थर्मासच्या अंतर्गत भागात फेरफार करुन सोन्याचा पत्रा लावला होता. तसेच अमेरिकेहून ड्रोन कॅमेरे घेऊन आलेल्या एका प्रवाशाला पकडले होते.