करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात मागील कित्येक दिवसापासुन सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. अशीच परिस्थिती पुणे जिल्ह्यात देखील आहे. दरम्यान आज निवारागृहात असलेल्या उत्तरप्रदेशातील 1 हजार 131 नागरिकांना पुणे स्टेशन ते लखनऊ अशा विशेष रेल्वेने त्यांच्या राज्यात रवाना करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, प्रेम वाघमारे यांच्यासह रेल्वे तसेच आरोग्य, पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पुणे शहर आणि जिल्ह्यात राहणार्‍या परप्रांतीय अनेक नागरिकांना त्यांच्या गावी पोहचविण्याच काम जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात येत आहे. आज रात्री उत्तरप्रदेशातील 1 हजार 131 नागरिकांना पुणे स्टेशन ते लखनऊ अशी विशेष रेल्वे रवाना झाली. त्यावेळी प्रशासनाकडून या प्रवाशांसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात आली. विशेष म्हणजे प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय आणि खाद्यपदार्थही देण्यात आले.