राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड ही शहरं करोनाबाधितांच्या संख्येत आघाडीवर दिसत आहेत. पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार ३९० नवे करोनाबाधित आढळले, तर २४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

करोनाबाधितांची संख्या आता ६५ हजार ९६६ वर पोहचली आहे. आजअखेर १ हजार ५४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ८७९9 रुग्णांची तब्येत बरी झाल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ४८ हजार ६१४ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १ हजार ९२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर १७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या २९ हजार १५७ वर पोहचली असून पैकी, २० हजार २६४ जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, आज ९५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयात ४ हजार ८७१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत आज दिवसभरात १ हजार ६६ नवे करोनाबाधित आढळले, तर ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २३ हजार ३९७ वर पोहचल आहे. यामध्ये आतापर्यंत रुग्णालयातून सुट्टी मिळालेले ९६ हजार ५८६ जण, सध्या उपचार घेत असलेले १९ हजार ७१८ रुग्ण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ६ हजार ७९६ जणांचा समावेश आहे.

राज्यात आज दिवसभरात १२ हजार २४८ नवे करोनाबाधित आढळले, तर ३९० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याचबरोबर आज दिवसभरात १३ हजार ३४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ५ लाख १५ हजार ३३२ वर पोहचली आहे. यामध्ये करोनामुक्त झालेले ३ लाख ५१ हजार ७१० जण, सध्या उपचार सुरू असलेले १ लाख ४५ हजार ५५८ रुग्ण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १७ हजार ७५७ जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.