14 October 2019

News Flash

‘कांचनगंगा’वर जागतिक विक्रमाची मराठी मुद्रा!

जगातील आठ हजार मीटरपेक्षा उंच असलेली १४ हिमशिखरे सर करण्याचे स्वप्न ‘गिरिप्रेमी’ने बाळगलेले आहे

पुणे : भारतातील सर्वोच्च आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या ‘कांचनगंगा’ या हिमशिखरावर बुधवारी पहाटे मराठी गिर्यारोहकांनी आपली मुद्रा उमटवली. पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या तब्बल १० गिर्यारोहकांनी पहाटे हे शिखर सर करत एकाचवेळी सर्वाधिक गिर्यारोहकांनी शिखर सर करण्याच्या जागतिक विक्रमाचीही नोंद केली.

जगातील आठ हजार मीटरपेक्षा उंच असलेली १४ हिमशिखरे सर करण्याचे स्वप्न ‘गिरिप्रेमी’ने बाळगलेले आहे. या अंतर्गत आतापर्यंत एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू, धौलागिरी, ओयू आणि मनास्लु ही सहा शिखरे संस्थेच्या गिर्यारोहकांनी सर केली असून बुधवारी या मालिकेत सातव्या अष्टहजारी हिमशिखरावर या ‘गिरिप्रेमीं’नी तिरंगा फडकवला आहे. असे यश प्राप्त करणारी ही देशातील एकमेव नागरी गिर्यारोहण संस्था ठरली आहे.

ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेल्या या ‘कांचनगंगा’ मोहिमेत आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे यांचा समावेश होता. या सर्व गिर्यारोहकांनी पहाटे साडेपाच ते सहा या कालावधीत ही शिखर-चढाई केली.

कांचनगंगा हे भारतातील सर्वोच्च हिमशिखर असून त्याची उंची ८५८६ मीटर आहे. हे शिखर चढाईसाठी तांत्रिकदृष्टय़ा जगातील सर्वात कठीण मानले जाते. यामुळे या शिखरावरील चढाईच्या मोहिमा आणि त्याला मिळालेले यश हे देखील इतर मोहिमांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. यंदाही जगभरातून केवळ ३० गिर्यारोहक या शिखर चढाईसाठी इथे आले होते. या सर्वच गिर्यारोहकांचे नेतृत्व उमेश झिरपे यांच्याकडे होते. यातील २१ गिर्यारोहकांनी बुधवारी हे शिखर सर केले. हे सर्व गिर्यारोहक शिखर सर करून परतीच्या मार्गावर असून सर्व जण सुखरूप असल्याचे झिरपे यांनी सांगितले.

गिर्यारोहणाला चालना मिळेल – झिरपे

कांचनगंगा शिखर हे चढाईसाठी तांत्रिकदृष्टय़ा अत्यंत कठीण आहे. ‘एव्हरेस्ट’ शिखर आजवर सहा हजारांच्या आसपास गिर्यारोहकांनी सर केले असताना ‘कांचनगंगा’वर मात्र आत्तापर्यंत केवळ ३००  गिर्यारोहकांनाच हे यश प्राप्त झाले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून येथील हवामान देखील खराब होते. याचा विचार करता ‘गिरिप्रेमी’ने केलेली कामगिरी ही अत्यंत स्पृहणीय असून या यशामुळे आपल्याकडील गिर्यारोहण क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे या मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी थेट कांचनगंगा येथून ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

First Published on May 16, 2019 2:59 am

Web Title: 10 marathi trekkers climbed on mount kanchenjunga