News Flash

पिंपरी-चिंचवडला उद्यापासून १० टक्के पाणीकपात; एकवेळ पाणीपुरवठा

मंगळवारी आयुक्त राजीव जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत १० टक्के पाणीकपातीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ऐन पावसाळ्यात पावसाने दिलेली ओढ, धरणक्षेत्रात कमी होत चाललेला साठा आणि पुढील सात महिन्यांचे नियोजन लक्षात घेऊन पिंपरी महापालिकेने गुरूवार (१० डिसेंबर) पासून संपूर्ण शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी आयुक्त राजीव जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत १० टक्के पाणीकपातीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शेजारील पुणे महापालिकेने गेल्या चार महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यापाठोपाठ पिंपरीने पाणीकपात लागू केली असून आवश्यकतेप्रमाणे त्यात वाढ करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
आयुक्त दालनात झालेल्या या बैठकीत उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, पक्षनेत्या मंगला कदम, गटनेते सुलभा उबाळे, अनंत कोऱ्हाळे, सुरेश म्हेत्रे, क्रीडा समितीचे सभापती समीर मासूळकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख महावीर कांबळे आदी उपस्थित होते. तथापि, महापौर शकुंतला धराडे उपस्थित नव्हत्या. जेमतेम अर्धा तास चाललेल्या या बैठकीत आधीच ठरलेल्या पाणीकपातीवर गटनेत्यांचे शिक्कामोर्तब करवून घेण्यात आले. याबाबतची माहिती आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. धरणक्षेत्रात सध्या ६६ टक्के पाणीसाठा आहे आणि तो जुलै २०१६ पर्यंत पुरवायचा आहे, त्यासाठी ही पाणीकपात आहे. सध्या काही ठिकाणी दोन वेळा पाणीपुरवठा होतो. यापुढे सरसकट एक वेळ पाणीपुरवठा होईल. सुरूवातीच्या काळात १० टक्के पाणीकपात राहील. तथापि, पाण्याचा दाब कमी होणार नाही. सध्याच्या पाणीपुरवठय़ाच्या कालावधीत २० ते २५ मिनिटे फरक पडू शकतो. तूर्त पाण्याचा साठा करावा लागणार नसल्याचे सांगत येणारे सात महिने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. काही र्निबध टाकण्यात येणार आहेत. त्यानुसार, पुढील पावसाळ्यापर्यंत नवीन व वाढीव नळजोड दिले जाणार नाहीत. अत्यावश्यक प्रकरणात ही अट शिथिल केली जाईल. आवश्यकतेप्रमाणे टँकरद्वारे पाणी दिले जाईल. पाण्याची गळती कमी करू. जतरण तलाव बंद ठेवण्याचा निर्णय लवकरच घेऊ. पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यापुढे २४ तास मोबाईल दूरध्वनीवर उपलब्ध असतील, त्यांना मोबाईल बंद करता येणार नाही. मार्च महिन्यात पाणीकपातीचा पुन्हा आढावा घेण्यात येईल व परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

आरडाओरडा करतात, त्यांचीच कामे आयुक्त करतात’
या बैठकीत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका शमीम पठाण यांनी काही मुद्दय़ांवर तीव्र आक्षेप घेतले. दोन दिवसापूर्वीच कपात सुरू केल्याचे व आधीच सर्व काही ठरल्याचे त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. एकवेळ द्या, मात्र मुबलक पाणी द्या, समान पाणीवाटप करा. माणसे पाहून पाणीवाटपाचे धोरण ठरवू नका. जे आरडाओरडा करतात, त्यांचीच कामे होतात. प्राधिकरणात पाच तास व इतरांना तीन तास पाणी, असा भेदभाव का, असा प्रश्न त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:25 am

Web Title: 10 water supply deduction in pimpri
Next Stories
1 गुलाबबाईंच्या अदांना रसिकांचा टाळ्यांचा प्रतिसाद
2 पुण्यात ३८५ बालकांचा ‘एमईएमएस’ रुग्णवाहिकांमध्ये जन्म!
3 अर्निबध नर्सरी शाळांचा पालकांच्या मागचा जाच कायम
Just Now!
X