देशभरातील विविध राज्यांमधील उत्कृष्ट कामगिरी असणा-या दहा विद्यापीठांना चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येकी तब्बल १०० कोटींचे अनुदान दिले जाणार आहे. या विद्यापीठांना त्यांच्या विशेष कॅम्पस कंपन्यांच्या निर्मितीसाठी दिला जाणारा हा विशेष निधी थेट केंद्राकडून मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय कॉरनेल, युपीन आणि युसी बर्कलेसह अमेरिकेतील सात विद्यापीठांकडून या विद्यापीठांना मार्गदर्शन मिळणार आहे. या दहा विद्यापीठात महाराष्ट्रातील शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणा-या पुणे विद्यापी‌ठाचा देखील समावेश आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठास कॅलिफोर्निया, बर्कले तर जम्मू विद्यापी‌ठास साउथ फ्लोरिडा व अन्य विद्यापीठ मार्गदर्शन करणार आहेत.

पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ, कोलकात्याचे जादवपूर विद्यापीठ आणि हरियाणाच्या कुरक्षेत्र विद्यापाठासह ज्यांचे नॅक (एनएएसी) मानांकन ३.५१ पेक्षा जास्त आहे. अशा १० विद्यापीठांच्या शैक्षणिक कामगिरीस प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियाना (रूसा) अंतर्गत प्रत्येकी १०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. हा निधी मार्च २०२० पर्यंत खर्च करण्याची अट घालण्यात आली आहे.
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने या दहा विद्यापीठांचा तुलना १९६० मधील आयआयटीशी केली आहे. शिवाय विद्यापी‌ठांच्या कॅम्पस कंपन्यांना आपले अतिरक्त स्त्रोत वाढवण्याची देखील परवानगी दिली जाणार असल्याची माहिती आहे. या दहा विद्यापीठांची निवड त्यांच्या यशाच्या चढत्या आलेखावरून करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्यसरकारला घेऊन ‘रूसा’ चा हा प्रयत्न आहे. यासाठी केंद्राकडून जवळपास ७० टक्के निधीस हातभार लावला जातो.

या कॅम्पस कंपन्या, ज्यांचे नेतृत्व कुलगरू व उपलब्ध प्राध्यापक, तज्ज्ञ मंडळी करतात त्यांना कामाचे सादरीकरण, रोजचा अहवाल, आठवड्यातील प्रगतीचा तक्ता व मासिक लेखजोखा याबाबत विचारले जाणार आहे. साधारणपणे निधी एका ठराविक शासकीय प्रक्रियेद्वारे मिळत असतो, मात्र केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून हा निधी थेट विद्यापीठांना मिळणार आहे.

सावित्रीबाई पुणे विद्यापीठ, कराईकुडीचे अलागप्पा विद्यापीठ आणि हैदराबादच्या उस्मानीया विद्यापी‌ठाने अगोदरच आपल्या कंपन्या तयार केल्या आहेत, तर ओदिशा सरकारने मात्र तेथील उत्कल विद्यापीठाला कंपनी निर्मितीसाठी खोडा घातला होता. जम्मू विद्यापी‌‌‌‌ठ कंपनी निर्मितीच्या प्रक्रियेत आहे.