पुणे शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या ४९ हजारांच्या पुढे गेली असून हजाराहून अधिक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील वाढती करोना बाधित रुग्णांची संख्या प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हटली जात आहे. आपल्याला करोना आजार झाल्याचे समजताच अनेक रुग्णांनी त्याच्या धसक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र पुण्यातील १०० वर्षांच्या दराडे आजींनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर करोनावर मात केली आहे. चंदननगर परिसरातील बोराटे नगर येथील आजी बाई दराडे (वय १००), जावई हरीशचंद्र घुगे (वय ६३), केशरबाई घुगे (वय ६०), मुलगी माधुरी दराडे (वय ३८), यशोधन दराडे (वय १६) आणि सानिया दराडे (वय १४) अशा एकाच कुटुंबातील सहा जणांना करोना झाला होता. त्यातील चारजणं करोनामुक्त झाले असून केशरबाई घुगे आणि मुलगी माधुरी दराडे या दोघींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर बाई दराडे यांचे जावई हरिचंद्र घुगे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “माझ्या पत्नीला सर्दी-खोकला याचा त्रास होऊ लागला. त्यावर आमच्या भागातील डॉक्टरांकडून उपचार घेतले. मात्र काही उपयोग झाला नाही. त्यानंतर आम्ही एका खासगी रूग्णालयात गेलो. तिथे आम्ही करोना चाचणी केली. त्यामध्ये आम्ही दोघे बाधित असल्याचे डॉक्टरनी सांगितले. त्यानुसार तपासणी केली असता माझ्या घरी सासू, मुलगी आणि तिची दोन मुले देखील राहत असल्याने त्या सर्वांची देखील तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सर्व बाधित असल्याचे सांगण्यात आले.” आम्हा सर्वांना आजींचं वय १०० असल्यामुळे तिच्यावर उपचार कसे केले जाणार याबद्दल टेन्शन आलं होतं. उपचार होत असतानाही आमचं आजींवर सारख लक्षं असायचं, तिला बोलता येत नव्हतं. आपल्याला काय झालंय, हे देखील तिला कळत नव्हतं, घुगे आपल्या सासुबाईंवर होत असलेल्या उपचाराबद्दल माहिती देत होते.

आजींची तब्येत लक्षात घेता डॉक्टरांनी लिक्विडद्वारे आजीला जेवण देण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी आमच्यासह आजीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत गेली. कालांतराने आम्हा चौघांना डिस्चार्ज देण्यात आला. पत्नी आणि मुलीलाही काही दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलं. आमच्या कुटुंबासाठी मागील पंधरा दिवसांचा काळ खूप कठीण होता. आमच्या घरातील सर्वच बाधित होतो. पण आम्ही सर्वांनी कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेतलं नाही. आपण लवकरच ठणठणीत बरे होऊन घरी जाणार आहोत असं आम्ही सुरुवातीच्या दिवसांपासून मनाशी निश्चित केलं होतं. तसेच आजीला इतर कोणत्याही प्रकारचा आजार नाही त्यामुळे तिने इच्छाशक्तीच्या जोरावर करोना मात केल्याचं घुगे यांनी सांगितलं. यावेळी बोलत असताना करोना आजार झाल्यावर कोणी भीती बाळगू नका, कायम सकारात्मक राहा. तसेच हा आजार होऊ नये या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहनही घुगे यांनी केलं.