कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक एवढेच नव्हे तर नाटक पाहताना कुरकुरणाऱ्या लहान मुलांना शांत करण्यासाठी क्राय रूम अशा रंगभूमीच्या सर्व घटकांचा विचार करून साकारण्यात आलेले बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याचे भूषण आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी स्वत: लक्ष घालून या रंगमंदिराची उभारणी होईल याची दक्षता घेतली. सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण केलेले बालगंधर्व रंगमंदिर हे केवळ पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीची समृद्धी नाही तर शहराचे वैभव वाढवीत मानाचा तुरा ठरले आहे.

Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
nashik, one man Arrested, Smuggling Liquor, Worth 66 Lakh, from Goa, smuggling Liquor from Goa, nashik Smuggling Liquor, nashik news, crime news,
मद्यसाठा तस्करीतील हस्तकास नाशिकमध्ये अटक
divyang survey marathi news, maharashtra divyang survey marathi news
राज्यात तीस वर्षांनी दिव्यांग सर्वेक्षणाला मुहूर्त… होणार काय?
Ajit Pawar appeal to the wrestlers of the district regarding the dispute in the wrestling federation pune
अजित पवार यांचा पैलवानांना ‘खुराक’; जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी मदत करण्याचे आवाहन

शहराच्या लौकिकामध्ये भर घालत पुण्याची शान झालेले आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी सूत्रधार होऊन कलाकार व प्रेक्षकांच्या सोयीसुविधांच्या पूर्ततेकडे लक्ष दिल्यामुळे साकारले गेलेल्या बालगंधर्व रंगमंदिराने जूनमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले. संगीत रंगभूमीवर आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा उमटविणारे नटसम्राट बालगंधर्व यांचे नाव असलेले रंगमंदिर ही पुणे शहराची एक स्वतंत्र ओळख झाली आहे. बालगंधर्व रंगमंदिराचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवून राज्यातील विविध शहरांमध्ये नाटय़गृहांची उभारणी करण्यात आली आहे.

जशा जन्मती तेज घेऊन तारा

जसा मोर घेऊन येतो पिसारा

तसा येई कंठात घेऊन गाणे

असा बालगंधर्व आता न होणे!

रतीचे दया रूप लावण्य लाभे

कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे

सुधेसारखा साद स्वर्गीय गाणे

असा बालगंधर्व आता न होणे!

अशा काव्यमय शब्दांत महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांनी बालगंधर्व यांचे समर्पक वर्णन केले आहे.

स्वातंत्र्योत्तर काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र रंगमंदिराच्या उभारणीला प्राधान्य देणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली आहे. संगीत रंगभूमीसाठी आपले जीवन वेचणारे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी साकारण्यात आलेल्या या रंगमंदिराचे भूमिपूजन ८ सप्टेंबर १९६२ रोजी दस्तुरखुद्द बालगंधर्व यांनीच केले होते. रंगमंदिराचे बांधकाम १९६६ मध्ये सुरू झाले. १५ जुलै १९६७ रोजी बालगंधर्व यांची प्राणज्योत मालवली. पु. ल. देशपांडे यांनी या रंगमंदिराची रचना सर्वोत्तम असावी यासाठी कष्ट घेतले. ज्येष्ठ चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडून पुलंनी ‘स्वयंवर’मधील रुक्मिणीच्या वेषातील आणि पुरुष वेषातील अशी बालगंधर्व यांची दोन मोठय़ा आकारातील तैलचित्रे करून घेतली. विशेष म्हणजे बालगंधर्वाच्या नाटकात वापरण्यात आलेला ऑर्गनही रंगमंदिरात तैलचित्रांखाली ठेवण्यात आला आहे. कलाकार, रसिक प्रेक्षक, तंत्रज्ञ यांच्या सोयीचा विचार करून ऐसपैस, सर्वोत्तम ध्वनिव्यवस्था आणि प्रशस्त रंगमंचासह नेपथ्य सामानाची गाडी रंगमंचावर उतरविण्याची सोय करण्यापासून ते कुरकुरणाऱ्या मुलांचा व्यत्यय येणार नाही यासाठी ‘ग्लासबॉक्स’ची सोय करण्यापर्यंतचा विचार पुलंनी केला आणि एक उत्कृष्ट रंगमंदिर साकारले गेले. ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के यांनी या रंगमंदिराची उभारणी केली.

बालगंधर्व यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २६ जून १९६८ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले होते. तेव्हाचे महापौर ना. ग. गोरे आणि पु. ल. देशपांडे यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम नेटका होईल याकडे लक्ष दिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आचार्य अत्रे उपस्थित राहू शकले नाहीत. पण, ‘मराठा’तील अत्रे यांच्या अग्रलेखाचे वाचन ना. ग. गोरे यांनी केले होते. पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार या दिग्गज कलाकारांनी नांदी सादर केली होती. तर, दुसऱ्या दिवशी ‘एकच प्याला’ नाटकाचा प्रयोग सादर झाला होता. तेव्हापासून हे रंगमंदिर पुणेकरांच्या जीवनाचा एक अविाभाज्य घटक झाला आहे. या रंगमंदिरामध्ये नाटकाचा प्रयोग करण्याचा आनंद आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविण्यासाठी रंगभूमीवरचा प्रत्येक कलाकार आसुसलेला असतो. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रयोग करणे ही जणू कलाकाराच्या जीवनातील भाग्याची गोष्ट असते.

मराठी नाटक आणि संगीतप्रेमी रसिकांसाठी बालगंधर्व रंगमंदिर आणि दिवाळी पहाट असे अनोखे समीकरण गेल्या २५ वर्षांहून अधिक काळपासून जुळून आले आहे. दिवाळीच्या पहाटे अभ्यंगस्नान आणि नवे कपडे परिधान करून शब्द-सुरांच्या मैफलीचा आनंद लुटण्यासाठी सुरू झालेला ‘दिवाळी पहाट’ उपक्रम यशस्वी झाला आहे. बालगंधर्व रंगमंदिरावर लावलेला आकाशकंदील, पहाटेच्या मंगल समयी पणत्यांच्या उजेडाने उजळून निघणारा बालगंधर्व रंगमंदिर परिसर पाहणे अनेक नागरिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरते. त्रिदल पुणे संस्थेतर्फे नरक चतुर्दशीच्या दिवशी होणारी ‘दिवाळी पहाट मैफल’ आणि संवाद पुणे संस्थेतर्फे ‘पाडवा पहाट’ या मैफली रसिकांच्या मर्मबंधातील ठेव ठरल्या आहेत.

मराठी रसिकांसाठी नाटय़संस्थांना चांगल्या पद्धतीने नाटकाचे प्रयोग सादर करता यावेत या उद्देशातून महापालिकेतर्फे चौमाही तारखांचे वाटप केले जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचा तसेच महापालिकेचा कार्यक्रम असेल तर नाटय़संस्थांना पूर्वकल्पना देऊन नाटकाची तारीख काढून घेताना नाटय़संस्थांना बदली तारीख दिली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखा हा सातत्याने चर्चेचा विषय होत आहे. सर्वच संस्थांना आपले कार्यक्रम या रंगमंदिरामध्येच व्हावेत असे वाटत असते हे त्यामागचे कारण आहे. सर्वच पुणेकरांचे बालगंधर्व रंगमंदिरावर विलक्षण प्रेम असल्याने येथील स्वच्छतेचा प्रश्न असो किंवा काही त्रुटी, त्या संदर्भात नागरिक या नाटय़संस्थांइतक्याच जागरूक असतात. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर ही केवळ दगड-विटांच्या बांधकामाची वास्तू राहिलेली नाही. तर रंगकर्मीसह अवघ्या पुणेकरांसाठी ते श्रद्धा आणि भक्तिभावाने नतमस्तक होण्याचे मंदिर झाले आहे.

ओंकारेश्वर ते नटेश्वर

बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी या परिसराचे वर्णन करीत नेमके निरीक्षण आपल्या ओघवत्या शैलीत मांडणाऱ्या पुलंचे भाषण गाजले होते. पुलं म्हणाले, इथं बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेषातील स्त्री म्हणजे झाशीची राणी आहे आणि आतल्या बाजूला गोपाळराव देऊस्करांनी चितारलेला स्त्रीवेषातील पुरुष म्हणजे गंधर्व आहेत. अर्धनारी नटेश्वराची दोन रूपं जिथं आहेत तिथं हे नटेश्वराचे मंदिर उभारलं जातंय, ही आनंदाची गोष्ट आहे. अलीकडे ‘नटेश्वर’ आहे, पलीकडे ‘ओंकारेश्वर’ आहे. मधून जीवनाची सरिता वाहतीय. आमचे महापौर त्याच्यावर पूल टाकणार आहेत. माझी विनंती आहे, की हा पूल एकतर्फी असू द्या.. ओंकारेश्वराकडून नटेश्वराकडे येणारा!