करोना विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील अनेक भागात नागरिक अडकून पडले आहे. तसेच काही मजुर मागील महिन्याभरापासून पुण्यात देखील अडकून पडले आहे. त्यामुळे अशा मजुरांनी गावी जाण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आज पुणे जिल्हय़ातील अनेक भागात असलेल्या निवारागृहामधील 1093 मजुरांना श्रमिक स्पेशल रेल्वे मार्फत रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे सोडण्यात आली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील,  उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे  यांच्यासह रेल्वे तसेच पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पुणे जिल्हा प्रशासनाकडून या प्रवाशांसाठी आवश्यक ती खबरदारी घेतली असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चोख व्यवस्था केली. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रवाशांची आरोग्य विभागाकडून तपासणी देखील करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली. तसेच प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची  खात्री करण्यात आली. या प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात देखील करण्यात आली होती.