नगर रस्त्यासह आणखी दोन रस्त्यांवरील बीआरटीसाठी दहा कोटी ९७ लाख रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेच्या मुख्य सभेत बुधवारी बहुमताने घेण्यात आला. बीआरटी योजनेसाठी नेहमी आग्रही असणाऱ्या काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला. मात्र, राष्ट्रवादी, मनसे, भाजप आणि शिवसेना हे चार पक्ष एकत्र आल्यामुळे निधी देण्याचा विषय मंजूर झाला. या निधीतून बीआरटी मार्गावरील प्रवाशांना मार्गावरील गाडय़ांची माहिती देण्यासाठी आवश्यक यंत्रणा थांब्यावर बसवली जाणार आहे.
नगर रस्ता, संगमवाडी रस्ता आणि परिसरात १६ किलोमीटर लांबीचे बीआरटी मार्ग बांधण्यात आले आहेत. या मार्गाचे सर्व काम पूर्ण झाले असले, तरी गेले वर्षभर हे मार्ग वापराअभावी पडून आहेत. या मार्गावरील थांब्यांवर प्रवाशांना मार्गदर्शन करणारी आवश्यक यंत्रणा बसवणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. ही यंत्रणा बसवल्याशिवाय बीआरटी मार्ग सुरू करता येणार नाहीत, असे केंद्र सरकारने महापालिकेला कळवले होते.
केंद्र सरकारने कळवल्याप्रमाणे या मार्गावरील थांब्यांवर आवश्यक यंत्रणा बसवण्यासाठी १० कोटी ९७ लाख रुपये खर्च येणार असून केंद्राची नेहरू योजना सध्या बंद असल्यामुळे हा खर्च महापालिकेने करावा असा प्रस्ताव होता. मात्र, तेवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे इतर विकासकामांसाठी प्रस्तावित केलेल्या निधीतून वर्गीकरण करावे व या यंत्रणेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला होता. त्याला बुधवारी मंजुरी देण्यात आली.
या प्रस्तावावरील चर्चेत उपमहापौर आबा बागूल, विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, मनसेचे गटनेता बाबू वागसकर, तसेच अविनाश बागवे, किशोर शिंदे, प्रशांत जगताप, सुनील गोगले यांनी भाग घेतला. काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध करत तो एक महिना पुढे घ्यावा, अशी तहकुबी दिली. मात्र, या तहकुबीला विरोध झाल्यामुळे मतदान घेण्यात आले. या मतदानात काँग्रेस विरुद्ध सर्व पक्ष असे विभाजन झाले आणि प्रस्ताव पुढे घेण्याची तहकुबी ११ विरुद्ध ४८ मतांनी फेटाळण्यात आली. त्यानंतर निधी देण्याच्या मूळ प्रस्तावालाही काँग्रेसने विरोध केला. त्यावरही मतदान घेण्यात आले आणि मूळ प्रस्ताव बहुमताने संमत करण्यात आला.
बीआरटीच्या थांब्यांवर जे प्रवासी असतील त्यांना त्या थांब्यावर येत असलेल्या पीएमपीच्या गाडीसंबंधीची माहिती इन्टलिजन्ट ट्रॅफिक सिस्टिम (आयटीएस) यंत्रणेद्वारे दिली जाईल. तसेच सीसी टीव्ही कॅमेरेही थांब्यांवर बसवले जातील, इंटरनेट सुविधाही  उपलब्ध असेल, अशी माहिती अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर यांनी सभेत दिली.