मुंबई आणि पुण्यात अकरावीची सर्व कोटय़ांची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन आणि शिक्षण विभागाकडून तयार करण्यात प्रवेश प्रणालीच्या माध्यमातूनच करण्यात यावी, असा अहवाल शिक्षण विभागाने शासनाकडे दिला आहे.

अकरावीसाठी ‘इन हाऊस कोटा’, ‘व्यवस्थापन कोटा’, ‘अल्पसंख्याक कोटा’ या राखीव कोटय़ातील प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयाच्या स्तरावर केल्या जात असल्यामुळे त्यात पारदर्शकता नसल्याचा आरोप करण्यात येत होता. त्या पाश्र्वभूमीवर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइनच व्हावी अशी मागणी करण्यात येत होती. दोन वर्षांपूर्वी या प्रवेश प्रक्रियेत झालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर वैशाली बाफना यांनी याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली. या वर्षी वेगवेगळ्या कोटय़ातील प्रवेश ऑनलाइन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या असल्या तरीही प्रवेश महाविद्यालयीन स्तरावरच करण्याची मुभा होती. मुंबई आणि पुण्यात झालेली प्रवेश प्रक्रिया वादातच अडकली. पुण्यात काही महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य़ प्रवेश देण्यात आल्याचेही समोर आले.

प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्याच्या सूचना देतानाच याबाबतचा अहवाल शासनाकडे मागितला होता. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली. या समितीने अहवाल शासनाला सादर केला आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. सर्व कोटय़ांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइनच करण्यात यावी. प्रवेश करण्याची मुभा महाविद्यालयांना देण्यात यावी. मात्र, महाविद्यालयांनी शिक्षण विभागाने तयार केलेल्या प्रणालीच्या माध्यमातूनच कोटय़ातील प्रवेश करावेत. नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कोटय़ातील प्रवेश करण्यात यावेत. दहावी उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रणालीत नोंदणी व्हावी. विद्यार्थ्यांची राज्यमंडळाकडे असलेली माहितीच आधारभूत मानण्यात यावी, अशा सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत.