राज्यातील विद्यापीठांमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास वर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांसाठी १२ टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तर आर्थिकदृष्टय़ा मागास घटकांसाठीचे १० टक्के आरक्षण कायम ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य शासनाने या बाबतचा निर्णय मंगळवारी प्रसिद्ध केला. या पूर्वी राज्य शासनाने विद्यापीठांना एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशांसाठी १६ टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय नोकर भरतीत १३ टक्के आणि शैक्षणिक संस्थांतील प्रवेशांसाठी १२ टक्के आरक्षण ठेवण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक प्रवेशांसाठी बदल करण्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे.

हे आरक्षण अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, विधी विद्यापीठे, स्वयंअर्थसहायित विद्यापीठे, या विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालयांना लागू असेल.

आरक्षणासंदर्भात संस्थांनी काही परिनियम तयार केले असल्यास या अनुषंगाने त्यात तातडीने सुधारणा कराव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.