आई रागावली म्हणून कुणालाही काही न सांगता रागाच्या भरात घराबाहेर पडलेली, एक १२ वर्षीय मुलगी पुणे ते मुंबई असा लोकलने प्रवास करताना एका आजीस आढळली. त्या आजीने तिची समजूत काढून तिला आपल्याबरोबर कामशेत रेल्वे स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांकडे सोपवल्याने, या मुलीची तिच्या आई-वडिलांशी पुन्हा भेट झाली. अनुराधा गाडे असं या मुलीचं नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमार घडली.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधा तिच्या मागील काही वर्षांपासून मुंबईमध्ये तिच्या आजीकडे राहते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ती पुण्यातील हडपसर भागात राहत असलेल्या तिच्या आईकडे आली होती. मात्र, बुधवारी सकाळी काही कारणांवरून तिला तिच्या आईने रागवले. हा राग मनात धरून ती पाणी घेऊन येते असं सांगून घराबाहेर पडली व थेट पुणे-लोणावळा लोकलमध्ये बसली. यावेळी ती जार भांबवलेली होती, तिच्याकडे मोबाइल देखील नव्हता. हे पाहून याच रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेने तिची चौकशी केली, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. परिस्थिती लक्षात आल्याने त्या महिलने तिला मी तुला बसमध्ये बसवून देते तू रेल्वेने एकटी प्रवास करू नको असे सांगून, आपल्याबरोबर घेतले, यानंतर कामशेत रेल्वेस्थानक आल्यावर तेथील रेल्वे अधिकाऱ्यांकडे सोपवलं. तेथील महिला रेल्वे पोलीस कर्मचारी एस. मोहिते यांनी मुलीची सविस्तर माहिती घेतली व तिच्या आई-वडिलांशी संपर्क साधुन तिला त्यांच्या स्वाधीन केलं.

एकटी अनुराधा मुंबईत पोहचली असती व तिला जर आपल्या पालकांशी संपर्क साधता आला नसता तर कुठलीही चुकीची घटना तिच्या बरोबर घडण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नव्हती. तिला अनेक संकटांना देखील सामोरे जावे लागले असते, मात्र रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका आजीच्या दक्षतेमुळे आज ती पुन्हा तिच्या आई-वडिलांकडे परतली आहे. दरम्यान, आई वडिलांनी मुलांना रागावल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ते रागाच्या भरात अनेक गोष्टी करू शकतात, असं आवाहन महिला रेल्वे पोलीस कर्मचारी एस. मोहिते यांनी केलं आहे.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस कर्मचारी पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते यांनी केली.