23 November 2017

News Flash

‘टेम्पल रोझ’च्या १२५० एकर जमिनीवर टाच

टेम्पल रोझ कंपनीची महाराष्ट्रासह चार राज्यांत सुमारे बाराशे पन्नास एकर जमीन आहे.

राहुल खळदकर, पुणे | Updated: September 12, 2017 3:41 AM

पुण्यातील गुंतवणूकदार नितीन शुक्ला, पृथ्वीराज परदेशी, मोहसीना सनाउल्ला, प्रथमेश पोरे यांनी प्रयत्न करून गुंतवणूकदारांना एकत्र आणले.

गुंतवणूकदारांना दिलासा; एजंटांकडून एक कोटी रुपये परत

मुंबईस्थित टेम्पल रोझ रिअल इस्टेट प्रा. लि. या कंपनीकडून महाराष्ट्र, ओदिशा, कर्नाटक, तेलंगणा भागात खरेदी करण्यात आलेल्या तब्बल १२५० एकर जमिनीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भूखंड खरेदीचे आमिष दाखविणाऱ्या या कंपनीकडून देशभरातील पाच हजार जणांची तसेच पुण्यातील साडेसहाशे जणांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले असून या कंपनीच्या अनेक एजंटांकडून पोलिसांनी आतापर्यंत एक कोटी रुपये वसूल केले आहेत.

पोलीस तसेच गुंतवणूकदारांच्या सामूहिक प्रयत्नांतून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येत असून त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. भूखंड खरेदीत गुंतवणूक करण्याच्या आमिषाने टेम्पल रोझ कंपनीकडून सुमारे अडीचशे ते साडेतीनशे कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या कंपनीने पुणे, मुंबईसह देशभरातील अनेकांना भूखंड खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करून कंपनीचा मुख्य संचालक देवीदास गोविंदराम सजनानी (वय ६७), एजंट रमेश जियंदमल अधीचा (वय ५७), सुनीला दादा गाजी (वय ५१), मुस्तफा जैनुद्दीन रामपुरावाला (वय ४७), मार्क्‍स योहान थोरात (वय ६३), केशव नारायण इदिया (वय ५३) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा (एम.पी.इ.डी.), फसवणूक तसेच प्राइज चिट मनी अँण्ड मनी सक्र्युलेशन अ‍ॅक्ट (गुंतवणूकदारांना विविध प्रकारची आमिषे दाखविणे) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्ह्य़ांच्या तपासात आरोपींकडून पैसे वसूल करणे किंवा मुद्देमाल जप्त करणे ही प्रक्रिया तशी किचकट मानली जाते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा मोठय़ा संख्येने गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.

पुणे शहरातील साडेसहाशे जणांची फसवणूक करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी गुंतवणूकदारांना एकत्र आणले. ज्या एजंटांनी भूखंड खरेदीचे आमिष दाखविले होते, त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला आणि गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमा परत करण्याचे आवाहन करण्यात आले. जे एजंट पैसे परत करणार नाहीत. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुणे शहरातील अनेक एजंटांनी स्वत:हून पोलिसांशी संपर्क साधला आणि पैसे परत करण्याची तयारी दाखविली. गुंतवणूकदारांचे पैसे जमा करण्यासाठी पोलिसांकडून स्टेट बँकेच्या शाखेत एक खाते उघडण्यात आले. आतापर्यंत एजंटांकडून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खात्यात जमा करण्यात आली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी दिली.

ते म्हणाले की, पोलिसांनी गुंतवणूकदारांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक गुंतवणूकदारांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी चार व्हॉट्स अ‍ॅप समूह सुरू करण्यात आले आहे. अनेकांनी भूखंड खरेदीत सुरुवातीला तीन ते चार लाख रुपये गुंतविले आहेत. टेम्पल रोझ कंपनीची महाराष्ट्रासह चार राज्यांत सुमारे बाराशे पन्नास एकर जमीन आहे. या जमिनीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून या जमिनीचा लिलाव केल्यास गुंतवणूकदारांना पैसे परत मिळतील.

टेम्पल रोझ कंपनीकडून अनेकांची फसवणूक करण्यात आली. पुण्यातील गुंतवणूकदार नितीन शुक्ला, पृथ्वीराज परदेशी, मोहसीना सनाउल्ला, प्रथमेश पोरे यांनी प्रयत्न करून गुंतवणूकदारांना एकत्र आणले. आठवडय़ातील प्रत्येक शनिवारी पुण्यातील गुंतवणूकदारांची बैठक पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात येते. पोलिसांकडून एजंटांची बैठक घेण्यात येते. पोलीस तसेच गुंतवणूकदारांच्या प्रयत्नांतून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे.

मंजिरी तिक्का, गुंतवणूकदार

First Published on September 12, 2017 3:41 am

Web Title: 1250 acres land of temple rose real estate attached by pune police