घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती पारंपरिक कार्यक्रमांनी साजरी करतानाच या जयंतीच्या निमित्ताने काही विषयांवर वैचारिक मंथन व्हावे, समाजाला उपयुक्त ठरेल अशी काही कृती व्हावी आणि परिवर्तनाच्या चळवळीलाही बळ मिळावे, असे प्रयत्न पुण्यात सुरू असून अशा उपक्रमांमधून नव्या पिढीलाही विधायक दिशा देण्याचा प्रयत्न होणार आहे.
डॉ. आंबेडकर जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची तयारी शहरात सध्या सर्व भागात सुरू असून अनेक मंडळे, संस्थांनी तीन-चार दिवसांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मिरवणुका तसेच सांस्कृतिक महोत्सव असे स्वरुप असलेले कार्यक्रम पुढील आठवडय़ात होणार असून त्या निमित्ताने शेकडो कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याबरोबरच वैचारिक स्वरुपाचे तसेच समाजोपयोगी स्वरुपाचे कार्यक्रम अनेक मंडळे आणि संस्थांनी आयोजित केले आहेत.
भारतरत्न डॉ. आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि आरपीआयतर्फे बोपोडीत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम हा याचीच प्रचिती देणारा आहे. या महोत्सवातील मुख्य भर विविध वैचारिक कार्यक्रमांवर असून विविध कार्यक्रमांद्वारे समाजप्रबोधन हे महोत्सवाचे सूत्र आहे. महोत्सवात ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते गंगाधर पानतवणे यांना विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सव विशेष पुरस्कार देऊन गौरविले जाईल आणि याच कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर डॉ. श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान होईल. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि स्त्रियांचे प्रश्न, भटके आदिवासी आणि डॉ. आंबेडकर या आणि अशासारख्या अनेक विषयांवर व्याख्याने, परिसंवाद हे या महोत्सवाचे वैशिष्टय़ असेल, असे मुख्य संयोजक परशुराम वाडेकर यांनी सांगितले.
या महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा मिळावी असेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून आंतरजातीय विवाह केलेल्या सव्वाशे जोडप्यांच्या सत्कार या महोत्सवात आवर्जून घडवून आणण्यात येणार आहे. जातीची बंधने तुटायची असतील तर आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत हा विचार डॉ. बाबासाहेबांनी मांडला होता. सद्य:स्थितीत मात्र या विचारांचा पाठपुरावा होताना दिसत नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन अशा जोडप्यांचा सत्कार आवर्जून केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दुष्काळी भागातून आलेले अनेक विद्यार्थी आहेत. हा महोत्सव साजरा करताना अशा विद्यार्थ्यांसाठीही काही ना काही करण्याची कल्पना असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ती समितीतर्फे केली जाणार असल्याची माहिती वाडेकर यांनी दिली. डॉ. आंबेडकरांचा जो वैचारिक वारसा आहे त्याची ओळख करून घेत तो वारसा जपण्याचा प्रयत्न होणे ही आजची खरी गरज आहे. विशेषत: नव्या पिढीने हा विचार समजून घ्यावा आणि त्यांना पुढच्या कामाची दिशा या कार्यक्रमांमधून मिळावी असा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असेही वाडेकर यांनी सांगितले.