मातृभूमीच्या सेवेत दाखल होण्याची इच्छा बाळगून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या स्नातकांपासून ते उच्च आणि जबाबदारीच्या पदांवर काम करणारे असंख्य अधिकारी हे भारतीय सैन्याचा अविभाज्य भाग आहेत. तुम्ही कुठेही राहिलात तरी सुरक्षितच राहाल, कारण भारतीय सैन्य सदैव तुमच्या संरक्षणार्थ सज्ज आहे, असा विश्वास दक्षिण मुख्यालयाचे कमांडंट इन चीफ लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी शनिवारी व्यक्त केला.

भारतीय लष्कराचे सर्वात जुने दल आणि सर्वात मोठे मुख्यालय अशी ख्याती असलेले दक्षिण मुख्यालय रविवारी १२५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. मुख्यालयाच्या स्थापनादिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळणारे कमांडंट इन चीफ लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

लेफ्टनंट जनरल सोनी म्हणाले, भारत भूमीचा सर्वाधिक ४१ टक्के भूभाग दक्षिण मुख्यालयाच्या अधिपत्याखाली येतो. देशातील सर्वात मोठे लष्करी मुख्यालय असाही दक्षिण मुख्यालयाचा परिचय आहे. या मुख्यालयाच्या अखत्यारित वाळवंट, किनारपट्टी आणि पठारी प्रदेश असा भूभाग आहे. त्यामुळे या सर्व प्रकारच्या युद्ध कौशल्यांसाठी आवश्यक प्रशिक्षण, तंत्रज्ञान यांच्यासह दक्षिण मुख्यालय सज्ज आहे. बदलत्या काळाबरोबर सैन्यात येणाऱ्या नव्या पिढीची बौद्धिक आणि सामाजिक जडणघडण देखील बदलत आहे, अशा परिस्थितीत उद्याच्या युद्धासाठी या नव्या पिढीला प्रक्षिक्षण देऊन तयार करणे हे लष्करासमोरील प्रमुख आव्हान आहे.

दक्षिण मुख्यालयाच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. भारतीय सैन्याचे युद्ध कौशल्य, सैन्याच्या ताफ्यातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यांची सुसज्जता या निमित्ताने पुणेकरांना अनुभवायला मिळाली. युद्धभूमीवरील रणगाडय़ांच्या हालचाली, हेलिकॉप्टरमधून पॅराशूटच्या मदतीने युद्धभूमीवर उतरून मोहीम पार पाडणारे सैनिक (पॅराट्रपर्स) यांच्या कामगिरीचा थरार आबालवृद्धांनी अनुभवला. युद्ध प्रात्यक्षिकांबरोबरच आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉग शो’ने लहान मुलांचे लक्ष वेधून घेतले. मीरत येथील आरव्हीसी सेंटरमधील लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड जातीच्या प्रशिक्षित श्वानांनी यात सहभाग घेतला. जवानांच्या आदेशावरून अडथळ्यांची शर्यत पार करणे, दहशतवादी किंवा त्यांनी लपवलेल्या स्फोटकांचा माग काढणे अशा कसरतींमुळे डॉग शो या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. बंगळुरूमधील सीएमपी सेंटर येथील जवानांनी मोटारसायकलींच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. बॉम्बे सॅपर्स आणि एआयपीटी सेंटरच्या जवानांनी जिम्नॅशियमची प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या जवानांनी ऐतिहासिक कलेरीपयटू या क्रीडाप्रकाराचे तर मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या जवानांनी मल्लखांबाचे सादरीकरण केले.

जिप्सीला अपघात

स्थापनादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युद्ध प्रात्यक्षिकांच्या दरम्यान वापरण्यात आलेल्या जिप्सी या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एका सैनिकाला पाठीची तर एका सैनिकाला हात आणि पायाची दुखापत झाली. अपघातातील जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.