बारावीच्या परीक्षा चार दिवसांवर आलेल्या असूनही प्रवेश पत्रांमधील गोंधळ अजूनही संपलेला नाही. एका विद्यार्थ्यांच्या नावाने वेगवेगळ्या परीक्षाक्रमांक असलेली एकपेक्षा अधिक प्रवेश पत्रे मिळाल्याने विद्यार्थी आणि पालक गोंधळून गेले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये असे आवाहन राज्यमंडळाने केले आहे.
पुण्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक प्रवेशपत्रे मिळाली आहेत. प्रत्येक प्रवेशपत्रावर वेगवेगळा परीक्षा क्रमांक आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक गोंधळून गेले आहेत. कोणते प्रवेशपत्र खरे मानायचे आणि कोणता परीक्षा क्रमांक गृहीत धरायचा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. पुण्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी अनेक प्रवेशपत्रे असल्याच्या तक्रारी अजूनही करत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रणालीमधील त्रुटींचा परिणाम आता परीक्षेच्या तोंडावर दिसत असल्याचे समोर येत आहे.
यावर्षी प्रथमच राज्यमंडळाने परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेतले आहेत. प्रणालीमधील काही त्रुटींमुळे एकाच विद्यार्थ्यांचे अर्ज अनेकवेळा भरल्याचे दिसत आहे. ‘अर्ज भरताना एरर येत असल्यामुळे तीन वेळा अर्ज भरावा लागला होता. आता हातात तीन वेगळी प्रवेशपत्रे मिळाली आहेत. त्यातील एक क्रमांक महाविद्यालयाने देऊन, दोन प्रवेशपत्रे रद्दही केली आहेत. मात्र, निकालामध्ये यांमुळे गोंधळ होऊ शकतो अशी भीती वाटत आहे,’ असे एका पालकानी सांगितले.
याबाबत स. प. महविद्यालयाच्या उपप्राचार्य सुरेखा डांगे यांनी सांगितले,‘‘आमच्याकडे साधारण १५ ते २० विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्राबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या तक्रारींबाबत विभागीय मंडळाकडे माहिती देण्यात आली असून एक परीक्षा क्रमांक ठेवून बाकीचे रद्द करण्यात आले आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये अशाप्रकारच्या तक्रारी येत आहेत.’’

‘‘आमच्याकडे अनेक प्रवेशपत्र मिळाल्याच्या तक्रारी नाहीत. मात्र, एकापेक्षा अधिक वेळा अर्ज भरला गेला असेल, तर असे घडू शकेल. विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. अशा प्रकारे एकापेक्षा जास्त प्रवेशपत्रे मिळाली असल्यास किंवा प्रवेश पत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास त्याबाबत महाविद्यालय आणि विभागीय मंडळाशी तातडीने संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. त्याचप्रमाणे निकालामध्येही काहीही गोंधळ होणार नाही.’’
– गंगाधर मम्हाणे, अध्यक्ष, राज्यमंडळ