राज्यातील करोनामुक्त नागरिकांची संख्या सात लाखांवर गेली असून साठ वर्षांहून अधिक वयाच्या १३ टक्के  नागरिकांचाही यात समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, करोनातून बरे होण्याचे प्रमाण साठ वर्षांवरील वयोगटात सर्वाधिक आहे. करोनातून मुक्त झालेल्या सात लाख नागरिकांचे विश्लेषण राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे, त्यातून ही माहिती समोर आली आहे.

रविवार (१३ सप्टेंबर) पर्यंत राज्यातील १० लाख ३७ हजार ७६५ जणांना करोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी ७,२८,५१२ रुग्ण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात २,७९,७६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवापर्यंत ५१,६४,८४० नागरिकांच्या वैद्यकीय नमुन्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १०,३७,७६५ म्हणजे २०.९ टक्के  रुग्णांना करोनाचा संसर्ग आढळून आला. रविवापर्यंत २९,११५ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

एका बाजूला रुग्ण आणि मृतांची संख्या अशी चिंताजनक बाब असताना ज्येष्ठ नागरिकांचे करोनामुक्त होण्याचे प्रमाण ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब ठरत आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांपैकी तब्बल ९१,९६४ म्हणजेच १३ टक्के  रुग्ण हे ६० वर्षांवरील वयोगटातील आहेत. ६१-७० वर्ष वयोगटातील ६१,२५३ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. ७१-८० वर्ष वयोगटातील करोनामुक्त रुग्णांची संख्या २४,१४० एवढी आहे.

८१-९० वर्ष वयोगटातील ५,९०६, तर ९१ वर्षांवरील ६५८ रुग्णही करोनातून बरे झाले आहेत. वयाची शंभरी पूर्ण के लेल्या सात रुग्णांनी करोनावर यशस्वी मात के ल्याचेही या विश्लेषणातून दिसून आले आहे.

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, राज्याचा आठवडय़ाचा मृत्युदर दोन टक्के पेक्षा कमी आहे. बरे होणाऱ्या रुग्णांपैकी ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण १३ टक्के  हे अत्यंत दिलासादायक आहे. करोना चाचण्यांची वाढती संख्या बघता नवे रुग्ण सापडणे साहजिक आहे. मात्र सात लाख नागरिक ठणठणीत बरे होऊन घरी गेले, ही बाब महत्त्वाची आहे, असेही डॉ. आवटे यांनी सांगितले.