पुणे शहरात दिवसभरात १३५ करोनाबाधित आढळले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ७९ हजार ७३३ वर पोहचली आहे. तर, आतापर्यंत ४ हजार ६५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २०२ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत शहरात १ लाख ७२ हजार २४४ जण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ८० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ७५ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिववसभरात चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९७ हजार ३५ वर पोहचली असून, यापैकी ९३ हजार ६६७ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६५३ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील करोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नसताना, आज करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण राज्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात राज्यात १० हजार ३६२ जणांनी करोनावर मात केली. तर, २ हजार ७६५ नवे करोनाबाधित आढळले. आतापर्यंत राज्यात १८ लाख ४७ हजार ३६१ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकीकडे दररोज करोनाचे नवे रुग्ण वाढत असताना, दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ४७ हजार ११ झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९४.८८ टक्के आहे.