पिंपरी पोलिसांकडून ४५ लाखांची रोकड जप्त

पिंपरी : चाकण परिसरात वीस कोटी रुपयांचे मेफोड्रोन हे अमली पदार्थ पकडल्याच्या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ४५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणात छोटा राजन टोळीचा सदस्य मुख्य म्होरक्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून एकूण १४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार सूर्यकांत काळे (वय ४२, रा. बोरीवली), राकेश श्रीकांत खानीवडेकर (वय ३३, रा. वसई) यांच्या शोधाकरिता गुन्हे शाखेच्या पथकाने सहा पथके तयार केली होती. मुंबई परिसरात आरोपींचा शोध घेतला असता मुंबई येथील सहारा विमानतळावर सात आरोपींचा शोध लागला. यामध्ये जुबी इफनेयी उडोको नावाचा नायजेरियन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. जुबी हा एका खटल्यामध्ये कोल्हापूर न्यायालयामध्ये दहा वर्ष शिक्षा भोगलेला आरोपी आहे. तुषार काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्य़ाच्या तपासामध्ये अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंदगिर गोसावी इतर आरोपींच्या मदतीने रांजणगांव येथील एका बंद पडलेल्या कंपनीमध्ये मेफोड्रोन अमली पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. अमली पदार्थ विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार चाकण शिक्रापूर रस्त्यावर अमली पदार्थसह आरोपींना सात ऑक्टोबर रोजी अटक

केली होती. अमली पदार्थ विक्री प्रकरणी ८५ लाख रुपयांच्या रकमेपैकी ४५ लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली. तसेच ७५ लाख रुपयांची मालमत्ता लाखबंद केली आहे.