News Flash

एकाच गावातील १४२ शेतकऱ्यांचा थकीत वीजबिल भरणा

राज्यात महावितरणच्या थकबाकीचा डोंगर सध्या ६३ हजार कोटींपेक्षाही मोठा झाला आहे.

पुणे : वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी सध्या आर्थिक संकटात आहे. राज्यात सर्वाधिक थकबाकी कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे आहे. हे ग्राहक वीजबिल भरतच नसल्याची ओरड सातत्याने केली जाते. मात्र, पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बोरी गावाने थकबाकीमुक्तीकडे वाटचाल सुरू करून राज्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. महावितरणच्या आवाहनानंतर कृषी धोरणाचा लाभ घेत एकाच वेळी १४२ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील वीजबिलांची ५१ लाखांची थकबाकी एकरकमी जमा केली.

राज्यात महावितरणच्या थकबाकीचा डोंगर सध्या ६३ हजार कोटींपेक्षाही मोठा झाला आहे. ही अभूतपूर्व थकबाकी वसूल करण्याचे मोठे आवाहन महावितरणपुढे आहे. त्यातील ७० टक्क््यांहून अधिक थकबाकी शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची आहे. ही थकबाकी वसूल करण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात लाभ देण्यासाठी कृषी धोरण जाहीर करण्यात आले आहे. या योजनेचा प्रसार करण्याबरोबरच थकबाकी भरण्यासाठी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच योजनेअंतर्गत बारामती परिमंडलांतर्गत येणाऱ्या बोरी या गावी मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या गावात महावितरणचे १०४१ ग्राहक असून, त्यांच्याकडे ७ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे.

योजनेचे फायदे लक्षात आल्यानंतर गावातील १४२ शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या ९६ लाख ७८ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी एकाच दिवसात ५१ लाख रुपयांचे वीजबिल एकरकमी भरून शासनाच्या धोरणाचे स्वागत केले. योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना ४५ लाख ७६ हजार रुपयांची माफी मिळाली. धनादेशाद्वारे त्यांनी थकीत रक्कम भरली. त्यामुळे महावितरणने संबंधित शेतकऱ्यांचा सत्कार केला. मेळाव्यास अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, उपकार्यकारी अभियंता मोहन सूळ, शाखा अभियंता अजर्यंसग यादव आदी उपस्थित होते.

योजनेचा लाभ लक्षात येताच थकबाकी जमा

कृषी धोरण २०२० मधील योजनेत शेतकऱ्यांनी या वर्षात सहभाग घेतल्यास थकबाकीवरील दंड, व्याज माफ करण्यात येत आहे. राहिलेल्या रकमेतील ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कमही माफ होणार आहे.  मेळाव्यातील शेतकऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी थकबाकी भरण्याची तयारी दर्शविली. १४२ शेतकऱ्यांनी तातडीने थकबाकीचा भरणाही केला. योजनेमध्ये साखर कारखाने, सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतीने थकबाकी वसुलीसाठी पुढाकार घेतल्यास त्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. बोरीला शंभर टक्के थकबाकीमुक्त करू आणि गावची वीज यंत्रणा सक्षम करण्याचा संकल्प सरपंच संदीप नेवरे आणि छत्रपती साखर कारखान्याचे बाळासाहेब पाटील यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 1:50 am

Web Title: 142 payment of overdue electricity bills of farmers akp 94
Next Stories
1 तब्बल दहा महिन्यांनंतर पुणे-दौंड मार्गावर रेल्वे
2 पूरग्रस्तांचे प्रश्न प्रलंबितच
3 ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांचे निधन
Just Now!
X