पुणे :  श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात हापूस आंब्यांची तुरळक आवक सुरू झाली आहे. मंगळवारी (९ फेब्रुवारी) फळबाजारात रत्नागिरीहून हापूस आंब्यांच्या १५ पेटय़ांची आवक झाली.

मार्केट यार्डातील फळ व्यापारी अरविंद मोरे यांच्या गाळ्यावर हापूसच्या पेटीची आवक झाली. फळबाजारातील व्यापारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते  संघटनेचे पदाधिकारी युवराज काची यांनी मोरे यांच्याकडून हापूसच्या पेटीची खरेदी केली. सहा डझनाच्या पेटीला ११ हजार १११ रुपये असा दर मिळाला आहे, अशी माहिती अरविंद मोरे यांनी दिली.

हापूस आंब्याचा हंगाम जून महिन्यांपर्यंत सुरू राहतो. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्यांचे आगमन बाजारात होते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात हापूसची आवक वाढते. एप्रिल आणि मे महिन्यात हापूसचा हंगाम जोमात सुरू होतो. त्या वेळी फळबाजारात दररोज रत्नागिरी हापूसच्या दहा हजार पेटय़ांची आवक होते आणि दरही सामान्यांच्या आवाक्यात येतात. यंदा फळधारणा चांगली झाली आहे. मध्यंतरी झालेला पाऊस तसेच हवामानाचा परिणाम हापूसच्या लागवडीवर झाला नाही, असे मोरे यांनी नमूद केले.