‘सोशल पोलिसिंग सेल’चा उपक्रम

पुणे : पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या संकल्पनेतून टाळेबंदीत गरजूंना मदत करण्यासाठी  ‘सोशल पोलिसिंग सेल’ या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून पोलिसांनी आतापर्यंत जेवण तसेच खाद्यपदार्थ मिळून १५ लाख १७ हजार ७८८ पाकिटांचे वाटप केले आहे.

‘सोशल पोलिसिंग सेल’कडून विशेष क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. एखाद्याला समस्येला सामोरे जावे लागत असेल, तर त्यांनी  ‘सोशल पोलिसिंग सेल’च्या क्रमांकावर ( मोबाइल  क्र-८८०६८०६३०८) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. टाळेबंदी लागू झाल्यानंतर पोलिसांनी शहरातील बेघर, परप्रांतीय कामगार, देहविक्रय करणाऱ्या महिला, रुग्णांचे नातेवाईक तसेच शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नियमित जेवणाची पाकिटे उपलब्ध करून दिली आहेत.

आतापर्यंत १५ लाख १७ हजार ७८८ जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले आहे. शहरात पूर्वाचलमधील विद्यार्थी वास्तव्यास आहेत. टाळेबंदीमुळे या विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. त्यांनाही जीवनावश्यक वस्तू तसेच जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. ससून रुग्णालय तसेच कमला नेहरू रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.

शहरात अडकलेले परप्रांतीय नागरिक, मजूर,  विद्यार्थी गावी रवाना होत आहेत. त्यांना पोलिसांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थाची पाकिटे, जंतुनाशके, मुखपट्टी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहायक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचारी गरजूंना मदत करत आहेत.