News Flash

देशातील १५ लाख शाळा बंद

‘युनिसेफ’च्या अहवालातून करोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम अधोरेखित 

(संग्रहित छायाचित्र)

करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे २०२०मध्ये देशभरातील १५ लाख शाळा बंद राहिल्याने प्राथमिक आणि माध्यमिकच्या २४ कोटी ७० लाख विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. देशातील चार विद्यार्थ्यांंपैकी केवळ एका विद्यार्थ्यांला ऑनलाइन शिक्षणासाठीची आवश्यक साधने उपलब्ध होत असल्याचे पाहणीतून दिसून आले आहे. करोनाच्या प्रादुर्भावाचा शिक्षणावर झालेला परिणाम या अहवालातून अधोरेखित होत आहे.

युनिसेफने केलेल्या पाहणीच्या अहवालाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले. मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत जगातील १४ देशातील शाळा जवळपास वर्षभरासाठी बंदच राहिल्या. त्यापैकी दोन तृतीयांश देश लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियनमधील आहेत. शाळा वर्षभरासाठी पूर्णपणे बंद किंवा काही कालावधीसाठी बंद असल्याचा फटका जगभरातील ८८ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांना बसला आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि जीवनमानावर धक्कादायक परिणाम झाले आहेत. ऑनलाइन शिक्षणाची सुविधा नसलेले विद्यार्थी पुन्हा वर्गात न येण्याचा धोका निर्माण झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

करोनापूर्व काळात भारतात केवळ २४ टक्के कुटुंबांमध्ये इंटरनेट जोडणी उपलब्ध होती. तसेच देशात ग्रामीण आणि शहरी भेद, लिंगभेद मोठय़ा प्रमाणात आहे. करोनापूर्व काळात देशात ६० लाख विद्यार्थी शाळाबाह्य़ असल्याचेही युनिसेफने नमूद केले आहे. त्यामुळे देशातील एकूण शिक्षणाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थी वंचित..

जगभरातील बहुतेक विद्यार्थी संवादासाठी, मदतीसाठी, आरोग्यासाठी आणि पोषक आहारासाठी शाळेवर अवलंबून असतात. मात्र जास्त काळासाठी शाळा बंद राहिल्याने विद्यार्थी त्यांच्या शालेय जीवनात या महत्त्वाच्या आणि संवेदनशील घटकांपासून वंचित राहिल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 12:16 am

Web Title: 15 lakh schools closed in the country abn 97
Next Stories
1 वाहनविषयक कामांसाठी आता ‘आधार’ अनिवार्य
2 Coronavirus – पुण्यात दिवसभरात ९०४ करोनाबाधित वाढले, सात रुग्णांचा मृत्यू
3 पुणेकरांनी करून दाखवलं! Ease of Living Index मध्ये बंगळुरूपाठोपाठ पुणे दुसऱ्या स्थानी!
Just Now!
X