फक्त एप्रिल महिन्यात दीड हजार मृत्यू

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण बऱ्यापैकी वाढत आहे. गेल्या वर्षभरात मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या साडेचार हजारांहून अधिक झाली आहे. फक्त एप्रिल महिन्यातच त्यातील सुमारे दीड हजार मृत्यू झाले आहेत.

पालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, चिंचवड व नेहरूनगर येथील करोना काळजी केंद्रासह १० इतर करोना केंद्रं आहेत, ज्या ठिकाणी करोना रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्यात येत आहेत. रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्य़ातील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. जवळपास दोन लाखांच्या घरात करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तरी उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांचे प्रमाणही मोठे आहे.

शहरातील करोनाचा पहिला मृत्यू गेल्या वर्षी १२ एप्रिलला झाला. सुरुवातीला मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी होते. नंतर मात्र करोना रुग्णसंख्येप्रमाणेच मृत्यूचे प्रमाणही वाढत गेले. गेल्या वर्षभरातील मृतांची संख्या ४७७७ इतकी आहे. एकटय़ा एप्रिल महिन्यात यापैकी सुमारे दीड हजार मृत्यू झाले आहेत. उशिरा उपचारांना सुरुवात करणारे, सहव्याधी तसेच जोखमीच्या आजाराची पार्श्वभूमी असणाऱ्यांची मृतांमधील संख्या मोठी असल्याचे सांगण्यात येते. नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगण्याचे व करोनानियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

* पिंपरीतील एकूण रुग्णसंख्या – २ लाख २१ हजार (५ मे पर्यंत)

* उपचार होऊन बरे झालेले – १ लाख ९७ हजार

* मृत्युसंख्या ( एकूण) – ४,७७७   *  पालिका हद्दीतील – ३,१७३

* हद्दीबाहेरील – १,६०४

 

दिवस   मृत्युसंख्या

१ मे       ९७

२ मे     ९२

३ मे     ९५

४ मे     ६३

५ मे     ६५