पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ग्वाही

पुणे : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासह पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे मजबूत करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण शहरात उच्च क्षमतेचे दीड हजार कॅमेरे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे, अशी ग्वाही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी दिली.

गुप्ता म्हणाले, पुणेकरांना सुरक्षितपणे घराबाहेर पडता यावे यासाठी नवीन योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. विविध रस्त्यांसह प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यामध्ये आणखी वाढ करून सीसीटीव्हींची संख्या दीड हजारांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था भक्कम होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी लावण्यात आलेल्या पण, सध्या नादुरुस्त असलेल्या कॅमेऱ्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची क्षमता काळानुरूप बदलत चालली आहे. त्या पाश्र्वभूमीवर सर्वच सीसीटीव्ही अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात आठ दिवसांत प्रस्ताव तयार करण्यात येणार असून त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस ठाण्यांच्या हद्दीची पुनर्रचना करावी लागणार आहे. त्यासाठी यापूर्वी रचना केलेल्या उपायुक्त कार्यालयांना राज्य सरकारची मान्यता घेणे बाकी आहे. त्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतर नव्याने सर्वेक्षण करून पोलीस ठाण्यांसह परिमंडल तयार केले जाणार आहेत, असे गुप्ता यांनी सांगितले.

वाहतूक कोंडीवर उपाय

वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ‘इंटेलियन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’चा (आयटीएमएस) वापर प्रभावीपणे केला जाणार आहे. पुढील २५ ते ३० वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून त्यासाठीचे नियोजन करावे लागणार आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक निर्णय घ्यावे लागणार असून त्यासाठी पुरेसे अधिकारी, कर्मचारी देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.