वैद्यकीय डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी आमटे यांच्यासह विविध क्षेत्रातील १६ प्रभावशाली महिलांना यंदाचा प्रतिष्ठित आय वुमन ग्लोबल अॅवॉर्ड जाहीर झाला आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी काम करणाऱ्या महिलांना या अॅवॉर्डने गौरविण्यात येते. च गडचिरोलीतल्या दुर्गम भागातील माडिया गोंड आदिवासी महिलांमधील आरोग्यासंबंधी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी मंदाताईंना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘आय वुमन ग्लोबल अॅवॉर्ड’ विविध क्षेत्रातील १६ महिलांनीही जिंकला आहे. यामध्ये ज्युरी जीवनगौरव पुरस्कार मंदिकिनी आमटे, बिझनेस आणि आंतप्रनरशिपसाठी सुप्रिती मिश्रा, ज्युरी अॅवॉर्ड स्पेशल मेंशन डॉ. कॅप्टन रितू बियानी, खेळासाठी चांद्रो तोमर, शिक्षण क्षेत्रासाठी डॉ. राधिका खन्ना, विज्ञान आणि संशोधनासाठी डॉ. पल्लवी तिवारी, कलेसाठी अंकिता बाजपेयी, ज्युरी अॅवॉर्ड स्पेशल मेंशन किरण सेठी, खेळासाठी ध्यानी दवे, खेळासाठी प्रकाशी तोमर, ज्युरी अॅवॉर्ड वुमन आयकॉन डॉ. लक्ष्मी गौतम, साहित्यासाठी इंदिरा डांगी, कलेसाठी अनुराधा ठाकूर, समाजिक कार्यासाठी रुमा देवी, ज्युरी अॅवॉर्ड स्पेशल मेंशन नैना पारेख, पर्यावरणासाठी मेधा ताडपत्रीकर यांनी हा पुरस्कार जिंकला आहे.

मंदाताईंना यापूर्वी २००८ मध्ये पती डॉ. प्रकाश आमटे यांच्याजोडीने कम्युनिटी लिडरशीपसाठी आशियातील नोबेल पारितोषिक समजल्या जाणाऱ्या रामन मॅगेसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले होते. गडचिरोलीतील भामरागडमधल्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाद्वारे पती प्रकाश आमटेंसह मंदाताईंनी इथल्या माडिया गोंड आदिवासी जमातींसाठी तसेच शेजारच्या आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातील आदिवासींसाठी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.

त्याचबरोबर लोकबिरादरी प्रकल्पात त्यांनी अनाथ जंगली प्राण्यांसाठी छोटासा निवारा उभारला आहे. यामध्ये शिकारीसाठी आदिवासींच्या हाती सापडलेल्या पशूंचीही सुटका करुन त्यांना निवारा उपलब्ध करु देण्यात आला आहे. यामध्ये बिबट्या, अस्वल, साप, हरीण, मगर आणि काही पक्षी आणि प्राणी यांचा समावेश आहे.

मंदाताईंच्या या कामाला आम्ही सलाम करतो असेही आय वुमन ग्लोबल अॅवॉर्ड समितीच्यावतीने म्हटले आहे.