देशातील २७९ संस्थांचा समावेश, मुंबईत सर्वाधिक
देशातील मान्यता नसलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची यादी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) आता दोन वर्षांनंतर अद्ययावत केली असून त्यामध्ये राज्यातील १८ अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या संस्थांचा समावेश आहे. तर देशात २७९ संस्था आहेत.
तंत्रशिक्षणाचा कोणताही अभ्यासक्रम चालवण्यासाठी संस्थेने एआयसीटीईची मान्यता घेणे आवश्यक असते. मान्यता नसलेल्या संस्थेतून मिळालेली पदवी ही अवैध ठरते. देशातील अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या मान्यता नसलेल्या संस्थांची यादी एआयसीटीईने जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यात १८ संस्था मान्यता न घेताच सुरू असल्याचे समोर आले आहे.
राज्यात मान्यता न घेता सुरू असलेल्या संस्थांची संख्या मुंबईत सर्वाधिक म्हणजे १५ आहे. यामध्ये अनेक नावाजलेल्या संस्थांचाही समावेश आहे. या शिवाय नाशिकमधील २ तर औरंगाबादमधील दोन संस्थांना मान्यता नसल्याचे परिषदेने जाहीर केले आहे.
मान्यता नसलेल्या संस्थांच्या यादीत देशांतील २७९ संस्थांचा समावेश आहे. अपवाद वगळता राज्यातील सर्व राज्यांत मान्यता नसतानाही संस्था सुरू असल्याचे समोर आले आहे.
देशांत दिल्लीत सर्वाधिक म्हणजे ६६ संस्थांना मान्यता नाही. यापूर्वी २०१४ मध्ये परिषदेने मान्यता नसलेल्या संस्थांची यादी जाहीर केली होती. परिषदेच्या संकेतस्थळावर मान्यता नसलेल्या संस्थांची राज्यानुसार यादी आणि पत्ते उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी संस्थेला आवश्यक मान्यता असल्याची खातरजमा करावी, असे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे.

Untitled-10