पिंपरी-चिंचवडमध्ये चोऱ्यांचे प्रकार रोखण्यास पोलीस यंत्रणेला अपयश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहन चोरीच्या घटनांनी कहर केला आहे. गेल्या आठवडय़ात दर दिवसाला चार ते पाच वाहन चोरीच्या घटना घडल्या. गेल्या अकरा महिन्यांच्या काळात दोन हजार २१ वाहनांची चोरी झाल्याची नोंद झाली आहे. सरासरी दरमहा १८३ वाहनांची चोरी होत असली तरी पोलीस यंत्रणा या चोऱ्या थांबवण्यात अपयशी ठरली आहे. वाहन चोरी विरोधी प्रतिबंधक स्थापन करण्यात आले असले तरी हे पथक पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याचे या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत १५ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी सहा वाहनांची चोरी झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. गेल्या आठवडय़ात वाहन चोरीच्या दिवसाला चार ते पाच घटना उघडकीस आल्या. इमारतीच्या वाहनतळामध्ये लावलेल्या दुचाकीही चोरटय़ांकडून लांबवल्या जात आहेत. पोलीस या घटना टाळण्यासाठी अपयशी ठरले असताना सीसीटीव्ही यंत्रणाही कुचकामी असल्याचे दिसत आहे. शहरात अनेक मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तरीही वाहन चोरीच्या घटनांना आळा बसलेला नाही.

तत्कालीन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी वाहनचोरी प्रतिबंधक पथक तयार केले होते. मात्र, या पथकाची कामगिरी सुमार दर्जाची राहिली आहे. वाहन चोरीच्या काही घटनांचा तपास सोडता हे पथक पूर्णपणे अपयशी ठरले आहे. वाहन चोरी पथकाला म्हाळुंगे येथे कार्यालय देण्यात आले आहे. शहराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या ठिकाणाहून वाहन चोरी प्रतिबंधक पथकातील कर्मचारी कामकाज पाहतात. त्यामुळे वाहन चोरीला आळा बसण्यापेक्षा घटना वाढतच आहेत.

या घटनांच्या तपासात कोणतीही प्रगती नाही. चोरीच्या वाहनांचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठीही केला जाऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी वाहन चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सुरक्षित ठिकाणी लावलेली वाहनेही वाहन चोरटय़ांकडून सहजपणे चोरली जात आहेत. हे प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी केली जात आहे.

वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या वाहन चोरी प्रतिबंधक पथकाला अशा घटना रोखण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड</strong>