सोन्याची तस्करी प्रकरणात केंद्रीय सीमा शुल्क विभागाने (कस्टम) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. या महिलेकडून तब्बल १८ लाख ९० हजार ४०० रूपयांचं ५५७. ग्रॅम वजन असलेल २४ कॅरेटच जप्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे महिलेने हे सोनं बुटात लपवून आणले होते. हे तस्करी करून आणलेले सोनं बँकॉकमार्गे देशात आणल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी उषा सिंग या महिलेला ताब्यात घेण्यात आले असून तिच्या विरोधात कस्टम कायद्यााअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोव्याहून पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या विमानातून तस्करीचे सोने आणण्यात येणार असल्याची माहिती कस्टमच्या पुणे विभागामधील पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला होता. विमानतळावर उतरल्यानंतर ही प्रवासी महिला गडबडीत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. ही बाब कस्टमच्या पथकाने हेरली आणि तिला ताब्यात घेत तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्या बुटात सोन्याचे तुकडे लपवून ठेवल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून सोन्याचे तुकडे काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पट्टीने बांधण्यात आले होते.

सोन्याच्या तुकड्यावर सिंगापूर येथील सोने उत्पादकांचा शिक्का आहे. या महिलेकडून जप्त करण्यात आलेले सोने सिंगापूरमधून आणल्याचा संशय आहे. तिने ज्या विमानातून प्रवास केला होता. ते विमान बँकाकहून आल्यानंतर देशाअंतर्गत वाहतुकीसाठी वापरण्यात येते. त्यामुळे सोने बँकॉक मार्गे भारतात आणले असल्याचा संशय आहे. कस्टमच्या सहआयुक्त वैशाली पतंगे, उपायुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.