News Flash

उत्तरेकडील अडीच लाख नागरिक पुण्यातून रवाना

उत्तरेकडील अडीच लाख नागरिक पुण्यातून रवाना

उत्तरेकडील अडीच लाख नागरिक पुण्यातून रवाना

पुणे : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्याआधी पुण्यात कठोर निर्बंध लागू झाल्यापासून आजपर्यंत सुमारे अडीच लाख नागरिक उत्तरेकडील त्यांच्या मूळ गावी रेल्वेने रवाना झाले आहेत. त्यात प्रामुख्याने मजूर-कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. उत्तरेकडील गाडय़ांना वाढती मागणी आणि प्रतीक्षा यादी लक्षात घेता पुणे रेल्वेकडून विशेष आणि अतिरिक्त गाडय़ांचे नियोजन करण्यात आले. अद्यापही मागणी कमी झाली नसल्याने महिनाअखेपर्यंत आणखी १५ अतिरिक्त गाडय़ा नियोजित करण्यात आल्याचे पुणे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

करोनाच्या पहिल्या लाटेनंतरच्या शिथिलीकरणामध्ये रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या विविध गाडय़ा विशेष गाडय़ा म्हणून  सुरू केल्या आहेत. पुण्यात प्रामुख्याने उत्तरेकडील गाडय़ांची संख्या अधिक आहे. उन्हाळी कालावधीत उत्तरेकडील गाडय़ांना दरवर्षी मागणी असते. त्यानुसार ती मार्चअखेरीसच सुरू झाली होती. मात्र, पुण्यात करोनाच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना स्थानिक प्रशासनाने १ एप्रिलपासूनच शहर आणि जिल्ह्य़ात निर्बंध लागू केले. त्यामुळे गाडय़ांची मागणी अचानक मोठय़ा प्रमाणावर वाढली. सध्या केवळ आरक्षणावरच गाडय़ांमध्ये प्रवेश दिला जात असल्याने उत्तरेकडील सर्वेच गाडय़ांची प्रतीक्षा यादी वाढत गेली. त्यामुळे विशेष अतिरिक्त गाडय़ांचे नियोजन करण्यात आले. त्यात पुणे स्थानकावरून दानापूर (पटना), भागलपूर (बिहार), गोरखपूर, लखनौ आदी भागांत अतिरिक्त गाडय़ा सोडण्यात आल्या १ तारखेपासून ३२ ते ३५ गाडय़ा या भागांत रवाना करण्यात आल्या आहेत.

अतिरिक्त गाडय़ांसह उत्तरेकडील राज्यांमध्ये महिन्यापासून विशेष नियमित गाडय़ांनाही मोठी मागणी आहे. पुणे स्थानकातून जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस, आझाद हिंदू, गोरखपूर, दामापूर, मंडुअडिहा आदी ठिकाणी दररोज गाडी सोडण्यात येत आहे. महिन्यापासून या सर्व गाडय़ा पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन जात आहेत. अतिरिक्त आणि विशेष गाडय़ा बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या मोठी मागणी असलेल्या तीन राज्यांतील प्रवाशांना उपयुक्त ठरतील, असे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गाडीत सुमारे १४०० प्रवाशांसाठी आसनक्षमता असून, त्यानुसार महिन्यात अडीच लाखांच्या आसपास नागरिक उत्तरेकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रवाशांची मागणी आणि प्रतीक्षा यादीवर लक्ष ठेवून रेल्वेकडून अतिरिक्त गाडय़ा सोडल्या जात आहेत. महिनाअखेपर्यंत आणखी गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. या सर्व गाडय़ा आरक्षणाच्या आहेत. प्रवाशांनी विनाकारण स्थानकावर गर्दी न करता केवळ कन्फर्म तिकिटधारकांनीच प्रवासापूर्वी ९० मिनिटे आधी स्थानकावर यावे.

– मनोज झंवर, पुणे रेल्वे जनसंपर्क अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 12:54 am

Web Title: 2 50 lakh citizens left pune after lockdown imposed zws 70
Next Stories
1 करोना संसर्गाचा आंब्याला फटका
2 पिंपरीत करोना रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला
3 बाजार समित्यांची निवडणूक लांबणीवर
Just Now!
X