तथाकथित ‘गोल्ड मॅन’ दत्ता फुगे यांची पत्नी सीमा यांचे नगरसेवकपद रद्द होऊ न देण्यासाठी त्यांच्याकडून ६१ लाखांची खंडणी घेणारे शिवसेनेचे कार्यकर्ते अशोक व मनोज कोतवाल यांना खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. माजी नगरसेवक असलेल्या सीमा फुगे यांनी जातीचा खोटा दाखला सादर करून इतर मागासवर्ग गटातून निवडणूक जिंकली होती. त्यांच्या विरोधात अशोक कोतवालची पत्नीने निवडणूक लढवली होती. त्यामुळे सीमा फुगे यांच्या विरोधात तक्रार न करण्यासाठी कोतवाल यांनी फुगे यांच्याकडून पैसे उकळले होते. मात्र, त्यानंतरही तक्रार दिल्याने सीमा फुगे यांचे पदही गेले. आता तिथे पोटनिवडणूक होत असून, या पाश्र्वभूमीवर ही अटक झाली आहे.
अशोक मधुकर कोतवाल (वय ३५) आणि मनोज मधुकर कोतवाल (वय ३०, रा. दोघेही भोसरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१२ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक झाली. यामध्ये भोसरी येथील प्रभाग क्रमांक ‘३५ अ’ हा ओबीसी राखीव होता. या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सीमा दत्ता फुगे यांनी शिवसेनेच्या सारिका अशोक कोतवाल यांचा पराभव केला होता. सारिकाचा पती आणि आरोपी अशोक याने सीमा यांची सर्व प्रमाणपत्र माहिती अधिकाराखाली मिळवल्यानंतर त्यातील ओबीसीचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे समजले. एप्रिल २०१२ मध्ये अशोक आणि त्याचा भाऊ मनोज यांनी दत्ता फुगे यांना ‘‘सीमा यांचे ओबीसीचे बनावट प्रमाणपत्र निवडणूक आयोग आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे देऊ. त्यामुळे तुमच्या पत्नीचे नगरसेवकपद रद्द होईल,’’ अशी धमकी दिली. ही तक्रार न करण्यासाठी त्यांच्याकडे दोघांनी एक कोटी रुपये खंडणीची मागणी केली. फुगे यांनी घाबरून वेळोवेळी आरोपींना ६१ लाख पन्नास हजार रुपये रोख दिले.
फुगे यांनी पैसे दिल्यानंतरही अशोक कोतवाल व त्याची पत्नी सारिका यांनी सीमा यांचे ओबीसीचे प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार केली. त्या तक्रारीवरून त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. एक महिन्यांपूर्वी फुगे यांनी आरोपींना दिलेले पैसे मागण्यासाठी त्याच्या भोसरी येथील घरी गेले. त्या वेळी कोतवाल याने त्याच्याजवळील पिस्तूल काढून घरातील भिंतीवर गोळी झाडून ते पिस्तूल फुगे यांच्या पोटाला लावले. पैसे परत मागितल्यास तुला आणि तुझ्या पत्नीला जिवे ठार करण्याची धमकी दिली.  त्यानंतर फुगे यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत व त्याच्या पथकाने मंगळवारी दोघांना अटक केली केली. त्यांनी घेतलेले पैसे कोठे उडविले याचा शोध सुरू आहे. अशोक कोतवाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध ठिकाणी एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती सावंत यांनी दिली.