टोळीयुद्धातून नीलेश घायवळ टोळीतील गुंड अमोल बधे (वय ४०, रा. हनुमाननगर, दत्तवाडी) याचा शनिवारी वैकुंठ स्मशानभूमीजवळ गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गजा मारणे टोळीतील दोघांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने ७ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  हल्ल्याच्या वेळी गजा मारणे हा हल्लेखोरांच्या मोटारीत चालकाच्या शेजारी बसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विशाल ऊर्फ गोट्या श्रीरंग िडबळे (वय २५) आणि त्याचा भाऊ सागर डिंबळे (वय २४, दोघेही रा. लडकतवाडी, दत्तवाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. नव्या पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी शेजारी परमार्थ निकेतन आश्रमाच्या समोर शनिवारी दुपारी चारच्या सुमारास गजा मारणे टोळीतील गुंडांनी बधे आणि त्याच्या तीन साथीदारांवर गोळीबार केला होता. त्यात संतोष कांबळे आणि लखन लोखंडे हे जखमी झाले आहेत. हे तिघेही मित्राच्या वडिलांचा अंत्यविधी उरकून परत जात असताना त्यांच्या मोटारसायकलला धडक देऊन त्यांना खाली पाडण्यात आले. त्यानंतर तिघे पळू लागल्यानंतर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या रुपेश मारणे आणि सागर राजपूत यांनी संतोष कांबळे याच्यावर गोळ्या झाडल्या. संतोष कांबळे याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  हल्लेखोरांमध्ये स्वत: गजा मारणे हा होता. तो मोटारीमध्ये चालकाच्या शेजारी बसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गजा मारणे याच्यासह बालाजी कदम, रुपेश मारणे, विकी बांदल, सागर राजपूत, सागर िडबळे, विकी सुमद्रे आणि अन्य दोघांनी या तिघांना घेरून गोळीबार केल्याचे त्याने म्हटले आहे.

वर्चस्वातून मारणे- घायवळ टोळीयुद्ध
नीलेश घायवळ आणि गजा मारणे हे दोघे एकाच टोळीत होते. घायवळ हा गजा मारणेचा हस्तक म्हणूनच वावरत होता; मात्र दोघांत वाद होऊन काही वर्षांपूर्वी घायवळ याने त्याची साथ सोडली आणि स्वतंत्र घायवळ टोळी स्थापन केली. तेव्हापासूनच दोन्ही टोळ्या एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. ३ नोव्हेंबर रोजी घायवळ टोळीतील गुंड पप्या गावडे याचा लवळे येथे खून करण्यात आला. त्यातही गजा आणि त्याचे साथीदार होते. त्यानंतर काल पुन्हा या टोळीने बधे याचा खून केला. त्यामुळे शहरात आता पुन्हा टोळीयुद्ध पेटले आहे.