शहरातील विविध बँकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
विशाल गोपालराव कपूर ऊर्फ फजाईल नजीर शेख ऊर्फ अहमद हुसे शेख ऊर्फ नीरज चंद्रकांत तन्ना (वय २९, रा. आयबीएम रस्ता, कोंढवा, मूळ-झारखंड) आणि आनंद खंडू वाघमारे (वय ३८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाघमारे हा सीटी बँकेत एजंट म्हणून कामाला होता. या प्रकरणी कोरेगाव पार्क येथील सीटी बँकेचे व्यवस्थापक अमित श्रीपाद शहाणे (वय ३०, रा. वडगाव बु.) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपूर याने बनावट कागदपत्रांच्या आधारे २७ ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान सीटी बँकेतून दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. परंतु, त्याने दाखल केलेल्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर ती बनावट असल्याचे आढळून आले. या प्रकरणी बँकेने गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे तपास केला असता चौकशीमध्ये आरोपीने शहरातील एचडीएफसी, एक्सीस, फुलरटन, बजाज फायनान्स, फ्युचर कॅपिटल, टाटा फायनान्स अशा विविध बँकांची बनावट कागदपत्राद्वारे ५३ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सहायक सरकारी वकील राजेंद्र सूर्यवंशी यांनी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य करत दोघांना ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.