करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी या काळात बंद राहणार असल्याचं सर्व सरकारी यंत्रणांनी सांगितलं आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिस कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सध्या प्रचंड ताण पडत आहे. रोज करोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. त्यांची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांवर आहे. तर लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांवरही पोलिस वचक ठेवून आहेत. सध्याच्या या खडतर काळात करोनाच्या संकटाशी लढा देणाऱ्या या व्यक्तींच्या भूकेची काळजी पिंपरी-चिंचडवडमधील दोन हॉटेल चालकांनी उचलली आहे.

दशरथ पाटील आणि पंकज जगदाळे या दोन हॉटेल चालकांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये पोलिस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोफत जेवणाचे डबे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील आणि जगदाळे दिवसातून दोनवेळा पिंपरी-चिंचवडमधील पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना १५० जेवणाचे डबे पुरवत आहेत. अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताच्या काळात आपल्या घरी जाता येत नाही, अशा कर्मचाऱ्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य असल्याचं पाटील यांनी सांगितलं. खडतर काळात रस्त्यावर उतरुन आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस आणि डॉक्टरांसाठी आपण हे काम करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये जास्तीत जास्त वेळ घरात राहण्याचं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या काळात जिवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडी राहतील मात्र लोकांनी या काळात गर्दी करु नये असं आवाहन केलं होतं. सध्या समाजाच्या प्रत्येक स्तरातील व्यक्ती करोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरत आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे या शहरांमध्ये अनेक करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अशा संकटकाळात पाटील आण जगदाळे यांनी दाखवलेली माणुसकी ही खरंच वाखणण्याजोगी आहे.