माहिती तंत्रज्ञानाचा मराठीतून वापर करण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) दोन तासांचा ई-लर्निग अभ्यासक्रम सुरू केला आहे. शुक्रवारपासून (१० मे) हा अभ्यासक्रम कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती ‘एमकेसीएल’ चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी बुधवारी दिली.
विवेक सावंत म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाचा मराठीतून वापर करण्यासाठी दहा कौशल्ये आत्मसात करण्याचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमातून मिळणार आहे. मराठी भाषा पडद्यावर असेल तरच ती टिकेल. मग हा पडदा संगणकाचा असेल किंवा मोबाईलचा असू शकेल. या माध्यमातून केवळ दोन तासांत ही कौशल्ये आत्मसात करता येतील. एमएस-सीआयटी अभ्यासक्रमाच्या धर्तीवर पाच हजार केंद्रांवर हा अभ्यासक्रम अवगत करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पाच लाख विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमाचे प्रमाणीकरण होईल. या अभ्यासक्रमाचा पुरस्कार करण्यासाठी भाषा सल्लागार समितीने ‘एमकेसीएल’ ला सहकार्य करावे.
मराठी भाषेतील विविध शब्दकोश इंटरनेटवर एकाच पोर्टलवर ठेवायला हवेत. या पोर्टलच्या निर्मितीसाठी एमकेसीएल सहकार्य करेल. त्याचप्रमाणे लोकांनी लोकांसाठी केलेली लोकांची प्रमाण भाषा करण्यासाठी एमकेसीएल आपले योगदान देऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकार अद्यापही युनिकोड फाउंडेशनचे सदस्य नाही. ही त्रुटी दूर करून फाउंडेशनचे सदस्य होत राज्य सरकारने देवनागरी लिपीला युनिकोडमध्ये संरक्षित केले पाहिजे, अशी मागणी विवेक सावंत यांनी केली.