सांगलीतील मतदार असल्याची तक्रार असणाऱ्या सुमारे एक लाख मतदारांची नावे एएसडी (स्थलांतरित, मृत व पत्त्यावर उपलब्ध नसणारे मतदार) यादीत टाकण्यात आली आहेत. या मतदारांना विधानसभेसाठी मतदान करता येणार असले, तरी त्यासाठी त्यांना मतदार ओळखपत्राशिवाय आणखी एक पुरावा सादर करावा लागणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. संबंधित तक्रारीमध्ये तथ्य नाही, मात्र खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सांगलीतील मतदार असणाऱ्या सुमारे एक लाख मतदारांची नावे पुण्यातील मतदार याद्यांमध्ये टाकण्यात आली असल्याची तक्रार करण्यात आली होती. या मतदारांच्या नावाची यादीही प्रशासनाला देण्यात आली होती. या प्रकारामुळे गोंधळाचे चित्र निर्माण झाल्याने निवडणूक आयोगाने या तक्रारींची गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर पुणे व सांगलीतील जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे त्याची चौकशी केली.
याबाबत सौरभ राव म्हणाले, दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत स्वतंत्र अहवाल दिला आहे. तक्रार असलेल्यांपैकी एक हजार नावांबाबत रखोल चौकशी करण्यात आली आहे. त्यानुसार तक्रारीत तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या मतदारांबाबत अक्षेप असल्याने त्यांची नावे एएसडी यादीत टाकण्यात आली आहेत. या यादीत त्यांची नावे असली, तरी त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यात येणार आहे. मतदान करण्यासाठी या मतदारांना मतदार ओळखपत्राबरोबरच पत्त्याचा आणखी एक पुरावा सादर करावा लागेल. मतदान प्रतिनिधींनाही या नावांबाबत कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मतदान कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षणामध्ये याची माहिती देण्यात येणार आहे. मतदान चिठ्ठय़ांमध्येही या मतदारांच्या नावापुढे ‘एएसडी’चा उल्लेख केला जाणार आहे.