कात्रजमधील अपघातात महिलेसह दोघे जखमी

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात दुचाकीस्वारासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागात घडली. अपघातात दुचाकीस्वारासह सहप्रवासी महिला जखमी झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुचाकीस्वार प्रवीण नारायण पवार (वय ३०, जाधव चाळ, जांभुळवाडी रस्ता, कात्रज) आणि सहप्रवासी किशोर विष्णू पांचाळ (वय १८,रा.लाटणे चाळ,कात्रज) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात दुचाकीस्वार रोहित पांडुरंग साळुंखे (वय १८,रा. अंजनीनगर, कात्रज), सहप्रवासी छबुताई नारायण पवार (वय ५५,रा. जाधव चाळ, जांभुळवाडी रस्ता, कात्रज) जखमी झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी दुचाकीस्वार पवार आणि त्यांची आई छबुताई स्वागत हॉटेलसमोरून जात होते. त्यावेळी समोरून येणारे दुचाकीस्वार पांचाळ आणि सहप्रवासी साळुंखे यांना दुचाकीने धडक झाली. अपघातात दुचाकीस्वार पवार, पांचाळ गंभीर जखमी झाले. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमी सहप्रवासी पवार आणि साळुंखे यांच्यावर उपचार सुरू आहेत. सहायक फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.

दरम्यान, कोंढवा भागात मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.आदिल रफीक शेख (वय ४३,रा. कमेला,कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वार शेख कोंढवा भागातून निघाले होते. इनामदार हॉस्पिटलसमोर भरधाव मोटारीने शेख यांना धडक दिली. अपघातानंतर मोटारचालक पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

करोना काळात टाळेबंदी लागू असल्याने रस्त्यावर नेहमी पेक्षा कमी वाहने असली तरी त्यांचा वेग बेफाम असल्याने अपघात होत आहेत.