कुत्र्यांपासून स्वतःचा जीव वाचवताना १०० फुट विहीरीत पडलेल्या बिबट्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. मात्र या प्रकारात बछड्यांच्या आईला आपले प्राण गमवावे लागले आहेत. संगमनेरमधील डिग्रस येथे हा प्रकार घडला आहे. आईचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर बिबट्याच्या बछड्यांना जुन्नर मधील माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात आणलं असून त्यांची देखभाल केली जात आहे, आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ३ महिन्यांची एक मादी आणि नर यांच्यामागे कुत्रे लागले होते. कुत्र्यांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बिबट्या आणि आईने विहीरीत उडी मारली. स्थानिक गावकऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला याबद्दलची माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बछड्यांची विहीरीतून सुटका केली. बछड्यांना बाहेर काढल्यानंतर ते प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. मात्र या घटनेत बछड्यांच्या आईचा मृत्यू झाल्यामुळे वनविभागाने त्यांना माणिकडोह केंद्रात हलवण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला आपल्या आईपासून दुरावलेले बछडे काहीही खात नव्हते. मात्र डॉक्टर अजय देशमुख आणि त्यांच्या टीमने बछड्यांची काळजी घेत त्यांच्यावर उपचार केले आहेत. सध्या या बछड्यांची प्रकृती सुधारत असल्याचं माणिकडोह निवारण केंद्राने स्पष्ट केलं आहे.