महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने निगडी व पिसोळी येथे सीएनजीचे नवे पंप सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे सातारा रस्त्यावरील पंप २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे. जूनमध्ये पौड रस्ता, वारजे व नगर रस्ता या ठिकाणी तीन नवे पंप सुरू करण्याचे आश्वासनही कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे. ‘सीएनजी’च्या प्रश्नावर रिक्षा पंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन व प्रत्यक्ष भेट घेऊन ही माहिती दिली.
शहरातील सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांची संख्या वाढत असताना त्या प्रमाणात सीएनजी पंपांची संख्या नसल्याने रिक्षा चालकांना सीएनजी मिळण्यात मोठय़ा अडचणी येत आहेत. नवे पंप सुरू होणार असल्याने काही प्रमाणात गैरसोय दूर होऊ शकणार आहे. शहरात सीएनजीचे दोन नवे पंप सुरू करण्याचे आश्वासन कंपनीच्या वतीने काही दिवसांपूर्वी देण्यात आले होते. त्या वेळी रिक्षा पंचायतीच्या वतीने करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार पंप सुरू न झाल्याने रिक्षा पंचायतीच्या वतीने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्या पाश्र्वभूमीवर दोन पंप सुरू झाल्याची माहिती देण्यात आली.महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे संचालक बी. एन. गोसेन, महाव्यवस्थापक संजय शर्मा, पणन व्यवस्थापक नावेद अख्तर यांनी रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव व निमंत्रक नितीन पवार यांची भेट घेऊन सीएनजीच्या पुरवठय़ाबाबतच्या अडचणी समजून घेतल्या. अख्तर हे पंचायतीच्या विशेष सभेतही उपस्थित राहिले व १० मे रोजी सत्याग्रह आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली.