पुणे : चीनमधील करोनाबाधित परिसरातून महाराष्ट्रात आलेल्या, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसल्याने विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या २० रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांना करोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने याबाबत निर्वाळा दिला आहे.

सोमवापर्यंत (३ फेब्रुवारी) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनमधून आलेल्या ११ हजार ९३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. मंगळवापर्यंत राज्यात बाधित भागातून १०७ प्रवासी आले असून १८ जानेवारीपासून त्यांपैकी २१ जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांच्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यापैकी २० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट करत आहेत. उर्वरित एका रुग्णाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होण्याची प्रतीक्षा आहे.

या अहवालांनतर रुग्णालयात दाखल असलेल्या २१ प्रवाशांपैकी १९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या नायडू रुग्णालयात एक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे एक रुग्ण भरती आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान शहरातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना भरती करून त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा १४ दिवस पाठपुरावा करण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १०७ प्रवाशांपैकी ३९ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नांदेड, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यंतही चीन आणि इतर बाधित भागातून आलेले प्रवासी आहेत, त्यांचा देखील पाठपुरावा करण्यात येत आहे.