‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ला उत्साहात प्रारंभ

पुणे : वातावरण भारून टाकणारे सनईचे मंगल सूर..रवींद्र परचुरे आणि प्रसाद खापर्डे या युवा गायकांची दमदार मैफील.. बहार आणणारे सरोदवादन.. परवीन सुलताना यांची रससिद्ध गायकी.. कलाकार समेवर येताच रसिकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद.. नव्या स्थळी ‘नवे सूर अन नवे तराणे’ गुंजत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बुधवारी उत्साहात प्रारंभ झाला.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलामध्ये ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला कल्याण अपार यांच्या सनईवादनाने सुरुवात झाली. माझ्या वादनाने महोत्सवाचा श्रीगणेशा करण्याची संधी लाभली, याचा आनंद झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षीच्या महोत्सवापासून ते यंदाच्या महोत्सवापर्यंत दिवंगत झालेल्या कलाकारांना आदरांजली अर्पण करण्यात आली. संगीतप्रेमी रसिकांना आवश्यकता भासली, तर वैद्यकीय उपचारांसाठी अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाच्या पाच डॉक्टरांचे पथक कार्यरत ठेवण्यात आले होते.

महोत्सवात कलाकारांना विविध वाद्यांची साथ करून मैफिलीत रंग भरणाऱ्या कलाकारांच्या भावमुद्रा टिपणारे सतीश पाकणीकर यांचे ‘संगतकार’ हे प्रदर्शन पाहण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. पाकणीकर यांच्या ‘स्वरसाधक’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर आणि उदय भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. माधव गुडी यांचे शिष्य डॉ. नागराज राव हवालदार यांनी लिहिलेल्या ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी-द व्हॉईस ऑफ पीपल’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. आनंद देशमुख यांच्या निवेदनाने रंग भरले.

‘ही माझी छोटी बहीण’, अशी पं. भीमसेन जोशी सगळीकडे माझी ओळख करून द्यायचे. त्यांनी दिलेली संधी आणि रसिकांच्या प्रेमामुळे अनेक कलाकार घडले, असे परवीन सुलताना यांनी सांगितले. आपले संगीत पवित्र आहे आणि सुरांतून सरस्वतीचे पूजन करतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सवाईच्या कलावंतांवर यू-टय़ूब चॅनेल!

अभिजात संगीताच्या प्रांतात जगभरात नावाजलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’मधील कलाकारांचे ‘अंतरंग’आता ‘भीमसेन स्टुडिओज’ या यु-टय़ूब चॅनेलद्वारे रसिकांसमोर येणार असून शनिवारी (१५ डिसेंबर) त्याचे उद्घाटन होणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास बुधवारी सुरुवात झाली. त्यापूर्वी सवाई गंधर्व स्मारक येथे झालेल्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली.

स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी आपले गुरू पं. सवाई गंधर्व यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेल्या या महोत्सवाने साडेसहा दशकांची वाटचाल पूर्ण केली आहे. सूर, ताल आणि लय यांचा अनोखा संगम असलेल्या या महोत्सवात अनेक दिग्गज कलाकारांचे सादरीकरण झाले आहे. या कलाकारांची जडणघडण आणि त्यांचा सांगीतिक प्रवास ‘भीमसेन स्टुडिओज’ या यु-टय़ूब चॅनेलच्या माध्यमातून संकलित करण्यात आला आहे. भीमसेन स्टुडिओज या यु—टय़ूब चॅनेलवर कलाकारांच्या सांगीतिक गप्पा पाहावयास मिळणार आहेत.

जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या कलेचा रसिकांना आस्वाद घेता येतो. मात्र, कलाकारांची जडणघडण, त्यांनी घेतलेले कष्ट, रियाज आणि संगीतविषयक विचार हे रसिकांपर्यंत फारसे पोहोचत नाही. ही उणीव दूर करण्याचा उद्देशातून यु—टय़ूब चॅनेलची संकल्पना साकारली जात आहे. महोत्सवात येणाऱ्या कलाकारांचे आठ ते नऊ  मिनिटांचे व्हिडीओ अपलोड करण्यात येणार आहेत. या माध्यमातून जगभरातील रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.