पुणे विभागात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना घरे बांधण्यासाठी २२० कोटी ३६ लाख २९ हजार रुपयांची मदत देण्यास राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. हा निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) अंतर्गत दिला जाईल.   पुणे विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्य़ांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठय़ा प्रमाणात घरांचे नुकसान झाले होते. ही बाब प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात निदर्शनास आली होती. त्यामुळे बाधितांना मदत देण्याबाबत शासनाने हा निर्णय घेतला आहे. बाधितांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून पात्र कुटुंबांना ग्रामीण आणि शहरी भागानुसार मदत दिली जाणार आहे. ही मदत पंतप्रधान आवास योजना, शबरी, रमाई आणि आदीम इत्यादी घरकुल योजनेखाली बाधितांना देण्यात येईल.