पुणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील दिलासादायक चित्र

पुणे : पुणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील २३ हजार नागरिक करोनातून ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. ऑगस्ट अखेरपासून सप्टेंबर महिन्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांपाठोपाठ जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर २३ हजार नागरिकांचे करोनामुक्त होणे ही बाब दिलासादायक आहे.

मागील पाच महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्य़ातील नागरिकांचे करोनामुक्त होण्याचे प्रमाण १८.१ टक्यांवरुन ६२.१९ टक्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात तब्बल एक लाख करोना चाचण्या झाल्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित जिल्हा मिळून हे प्रमाण ९,६३,२९३ एवढे आहे. या चाचण्यांमधून पुणे महापालिका क्षेत्रात १,२२,४४८, पिंपरी चिंचवडमध्ये ६५,३७९ तर ग्रामीण भागात ३८,८२४ रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्य़ातील एकू ण करोना रुग्णांची संख्या २,३१,१९६ एवढी असून त्यांपैकी १,८४,६४९ नागरिक करोनामुक्त झाले आहेत.

१४ सप्टेंबपर्यंत जिल्ह्य़ात ३७,७८६ रुग्ण होते. त्या तुलनेत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या मात्र २३,५३७ एवढी होती. त्यामुळे करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ६२.२९ टक्के  असल्याचे दिसून आले आहे. नऊ मार्चला पुणे शहरातील पहिल्या करोना रुग्णांची नोंद झाली.

त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. मात्र, ग्रामीण भागात हे लोण २३ मार्चच्या दरम्यान पोहोचले. १४ एप्रिलपर्यंत जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील १८ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले. १७ मे पर्यंत हे प्रमाण ४३.९७ टक्के  एवढे झाले. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात रुग्ण बरे होण्याचा दर तीन टक्के  कमी झाला. ३० जूननंतर त्यात पुन्हा वाढ दिसण्यास सुरुवात झाली. सध्या हे प्रमाण ६२ टक्के  असल्याने रुग्ण आणि प्रशासन दोन्हींसाठी ही बाब समाधानाची असल्याचे जिल्ह्य़ाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

करोना केंद्रात गोंधळ घालणाऱ्या महिलेसह दोघांवर गुन्हा

पुणे : आंबेगाव  भागातील करोना तपासणी केंद्रात गोंधळ घालणाऱ्या महिलेसह दोघांविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शिवानी श्रीकांत उगले, प्रीतम संजय बोंद्रे (रा. आंबेगाव बुद्रुक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे आरोग्य निरीक्षक नितीन राजगुरू यांनी यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उगले, बोंद्रे मंगळवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक भागातील लक्ष्मीबाई हजारे वसतिगृहातील करोना तपासणी केंद्रात आले. त्या वेळी दोघांना रांगेत थांबण्यास सांगण्यात आले. दोघांनी आमची तपासणी पहिली करा, असे सांगून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तेथील वैद्यकीय तज्ज्ञांबरोबर हुज्जत घालून अरेरावी केली. उगले, बोंद्रे यांना रांगेत थांबण्यास सांगितल्याने त्यांनी तेथील टेबलावर ठेवलेले करोना बाधित रुग्णांचे तपासणी नमुने, तपासणी संच फेकून दिले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोघां विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक ए. आर. कवठेकर तपास करत आहेत.