06 August 2020

News Flash

२३ हजार चौरसफूट जागेची मागणी

संभाजी उद्यानाची सर्वाधिक जागेची मागणी करण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मेट्रो प्रकल्पांतर्गत विविध कामे; पालिकेकडे प्रस्ताव

पुणे : मेट्रो प्रकल्पांतर्गत विविध कामे करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने शहरातील सहा उद्यानांची जागा महापालिकेकडे मागितली आहे. मेट्रो स्थानके तसेच मेट्रोच्या अन्य कामांसाठी २३ हजार चौरसफूट जागा उपलब्ध व्हावी, असा प्रस्ताव महामेट्रोने पालिकेला दिला आहे. त्यातील सर्वाधिक मागणी जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाच्या जागेची असून या उद्यानाच्या १० हजार चौरसफूट जागेची मागणी महामेट्रोकडून करण्यात आली आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या एकूण ३२ किलोमीटर लांबीच्या मार्गिकांची कामे महाराष्ट्र मेट्रोकडून सुरू करण्यात आली आहेत. यातील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची कामे वेगात सुरू असून उन्नत स्वरूपाच्या या मार्गिकेसाठी खांब उभारणीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. मेट्रो मार्गिकांसाठी स्थानके, वाहनतळांची उभारणी वा खांब उभारणीसाठी महामेट्रोला काही जागा हव्या आहेत. शहरातील २७ ठिकाणच्या जागा महामेट्रोला हव्या आहेत. त्यानुसार सर्वेक्षण करून महामेट्रोने सहा उद्यानांच्या २३ हजार चौरसफूट जागेची मागणी करणारा प्रस्ताव पहिल्या टप्प्यात दिला आहे.

जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान, शनिवार पेठेतील नाना-नानी पार्क, कल्याणीनगर येथील व्हिटोरिया गार्डन, बंडगार्डन, कोथरूड येथील निळू फुले उद्यान आणि रुबी हॉल शेजारील रमाबाई आंबेडकर गार्डनच्या जागेचा यात समावेश आहे. यात संभाजी उद्यानाची सर्वाधिक जागेची मागणी करण्यात आली आहे. संभाजी उद्यानाशेजारी मेट्रोचे स्थानक प्रस्तावित असल्यामुळे  संभाजी उद्यानातील १ हजार ४०० चौरस मीटर जागा महामेट्रोला हवी आहे. पालिकेला असा प्रस्ताव देण्यात आल्याच्या माहितीला महामेट्रोचे भूसंपादन विभागाचे सहव्यवस्थापक प्रल्हाद कचरे यांनी दुजोरा दिला. पालिकेच्या ताब्यातील काही उद्यानांच्या जागेची मागणी करण्यात आली आहे. त्या संदर्भात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा यांच्याबरोबर महामेट्रो आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक झाली असून जागेत महामेट्रो काय करणार आहे, त्यासाठी किती जागा लागणार आहे त्याचे आराखडे आणि नकाशे सादर करण्यास महामेट्रोला सांगण्यात आल्याचे कचरे यांनी सांगितले.

महामेट्रोकडून उद्यान विभागाच्या काही जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यावर विचार सुरू आहे. महापालिकेची मुख्य सभा त्याबाबतचा योग्य तो निर्णय एकमताने घेईल.

– अशोक घोरपडे, उद्यान विभाग प्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2019 12:32 am

Web Title: 23000 square feet space demand for various works under metro projects
Next Stories
1 ‘झोपु’ योजनेसाठी तीन हजार कोटी खर्च?
2 संक्रातीसाठी खास चिक्की गुळाची आवक!
3 पैशांचा पाऊस पाडतो असे सांगत मांडूळ विक्री करणारे दोघे अटकेत
Just Now!
X