लोकसभा, विधानसभेनंतर बदललेली समीकरणे, सत्तारूढ राष्ट्रवादीतील गटबाजी आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अनिश्चिततेच्या वातावरणात शिक्षण मंडळाची २३ मार्चला निवडणूक होत आहे. मंडळात स्पष्ट बहुमत असलेल्या राष्ट्रवादीकडे सभापतिपद कायम राहणार की सत्ताधाऱ्यांना ‘धोबीपछाड’चा अनुभव घ्यावा लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिक्षण मंडळ सभापती व उपसभापतिपदासाठी पालिकेत १९ मार्चला अर्ज उपलब्ध होणार आहेत. तत्पूर्वी, १२ मार्चपर्यंत पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. मावळते सभापती फजल शेख, उपसभापती सविता खुळे, विजय लोखंडे, शिरीष जाधव, चेतन घुले, नाना शिवले, निवृत्ती िशदे, धनंजय भालेकर, चेतन भुजबळ, लता ओव्हाळ असे राष्ट्रवादीचे दहाचे संख्याबळ आहे. विष्णुपंत नेवाळे व श्याम आगरवाल हे काँग्रेसचे दोन सदस्य असून दोन शासकीय सदस्यही आहेत. मंडळात कागदावर राष्ट्रवादीचे बहुमत असले तरी प्रत्यक्षात तसे नाही. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार लक्ष्मण जगताप यांचे चार आणि राष्ट्रवादीतील नाराज नेते माजी आमदार विलास लांडे यांचे दोन समर्थक सदस्य मंडळात आहेत. निवडणूक झाल्यास या सहा सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. काँग्रेसचे दोन सदस्य कोणाच्या पारडय़ात मते टाकतात, याचीही उत्सुकता आहे. उमेदवारी देताना अजित पवार यांना सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. उमेदवारी चुकली तर वेगळी समीकरणे उदयास येतील, असा अंदाज वर्तवण्यात येतो.