13 July 2020

News Flash

शिवनेरी परिसरातील विकासकामांसाठी २३ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली. या दिशेने सरकारचे काम चालू आहे.

सनई-चौघडय़ाचे मंजूळ स्वर, तुतारीचा निनाद, ढोल-ताशांचा गजर, ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष अशा उत्साही वातावरणात किल्ले शिवनेरी येथे पारंपरिक पद्धतीने श्री शिवजयंती उत्सव बुधवारी साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशातील महिलांनी श्री शिवरायांची महती सांगणारा पाळणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गायला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती श्री शिवरायांना मानवंदना दिली. दरवर्षीप्रमाणे आनंदमयी वातावरणात आणि हजारो शिवभक्तांच्या साक्षीने हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला.

शिवनेरीवर श्री शिवजयंती उत्साहात साजरी

पुणे : ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष करत आनंदमयी वातावरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर मंगळवारी श्री शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदीअभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता घेतली जात असून गड आणि परिसरातील विकास कामांसाठी तातडीने २३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी केली.

प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी श्री शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी बालशिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

‘शिवनेरी आपले वैभव आहे. या वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू,’ असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली. या दिशेने सरकारचे काम चालू आहे.

मराठा आरक्षणाच्या वेळी दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या चौकटीत राहून मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या गुन्ह्य़ात शासकीय मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले नाही, ते गुन्हे नियमांच्या अधीन राहून मागे घेऊ, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील या वेळी उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 2:55 am

Web Title: 25 crore for development works in shivneri area says ajit pawar zws 70
Next Stories
1 हडसर किल्ल्यावरून दरीत पडल्याने मुंबईतील युवतीचा मृत्यू
2 एकस्व अधिकार, बौद्धिक संपदेतील फरक विद्यापीठाला कळेना!
3 लोणावळा-दौंडसाठी ‘डेमू’
Just Now!
X