करोना संकटात लोकप्रिय २५० पुस्तके २५ टक्के सवलतीत; अनोखे वाचन जागर अभियान

पुणे : करोना संकटानंतर हळूहळू एक एक क्षेत्र खुले होत असताना वाचनवेडय़ांचा वाचन उपवास समाप्त करण्यासाठी दहा प्रकाशकांनी वज्रमूठ केली आहे. या प्रकाशकांनी ‘वाचन जागर अभियाना’चा भाग म्हणून दिवाळीनिमित्त १ ते २५ नोव्हेंबरदरम्यान वाचकप्रिय २५० पुस्तकांवर २५ टक्के सवलतीची अक्षरभेट जाहीर केली आहे.

टाळेबंदीच्या परिणामांना सर्वानाच व्यक्तिगत आणि सामूहिक पातळ्यांवर सामोरे जावे लागले. वाचनाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. या काळात वाचनवेडय़ांच्या हाती पुस्तक पडले नाही. भरपूर सवड असूनही  पुस्तके मिळू शकली नाहीत. हा दीर्घकाळचा वाचनविरह संपवण्यासाठी मेहता, मॅजेस्टिक, साधना, ज्योत्स्ना, रोहन, मनोविकास, डायमंड, पद्मगंधा, साकेत आणि राजहंस हे मराठीतील दहा नामवंत प्रकाशक एकत्र आले आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त खास ‘वाचन जागर अभियान’चे आयोजन केले आहे.

लेखक येती भेटीला..

या योजनेचे औचित्य साधून प्रत्येक पुस्तक विक्री केंद्रावर ‘लेखक तुमच्या भेटीला’सारखे कार्यक्रमही आयोजित करण्याचा संकल्प प्रकाशकांनी केला आहे. ही योजना म्हणजे वाचकांची पावले पुन्हा पुस्तकाकडे वळवणारी, वाचकाच्या हातात पुन्हा पुस्तक देणारी आणि त्याची नजर पुन्हा पुस्तकाच्या पानावर खिळवणारी एक आश्वासक सुरुवात ठरावी, अशा शुभेच्छा साहित्यिक आणि रसिक वाचकांनी दिल्या आहेत.

राजहंस प्रकाशनच्या विविध योजनांना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, परंतु दहा प्रकाशक एकत्र आल्याने वाचकांना विषयांची विविधता मिळेल.

दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन

करोनामुळे ग्रंथव्यवहार क्षेत्रात आलेला संथपणा दूर करण्यासाठी सर्व प्रकाशकांनी एकत्र येऊन वाचन जागर अभियान राबवावे, असे ठरविले आहे. या उपक्रमाचा वाचकांना लाभ होईल.

– अरुण जाखडे, पद्मगंधा प्रकाशन

सर्वानी एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे या उद्देशाने दहा प्रकाशक एकत्र आले आहेत. त्यातून वाचकांना सवलतीत पुस्तके मिळतील, ग्रंथव्यवहाराला चालना मिळेल.

– प्रदीप चंपानेरकर, रोहन प्रकाशन

करोनामुळे दुकानांत येऊन पुस्तके खरेदी करण्याचे प्रमाण घटले आहे. वाचकांची पावले पुन्हा एकदा दुकानाकडे वळावीत, हा वाचन जागर अभियानाचा उद्देश आहे.

– अरविंद पाटकर (मनोविकास प्रकाशन)

* मेहता, मॅजेस्टिक, साधना, ज्योत्स्ना, रोहन, मनोविकास, डायमंड, पद्मगंधा, साकेत आणि राजहंस या मराठीतील आघाडीच्या प्रकाशकांची प्रत्येकी २५ पुस्तके ‘वाचन जागर अभियान’ या  योजनेमध्ये वाचकांना २५ टक्के सवलतीने मिळतील.

* ही  पुस्तके राज्यातील ३५ प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध होतील. आज, रविवार, १ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या या योजनेची मुदत २५ नोव्हेंबपर्यंत असेल.

सवलत यादीतील काही पुस्तके..

सेपिअन्स (युव्हाल नोआ हरारी), पक्षी-आपले सख्खे शेजारी (किरण पुरंदरे), आनंदी गोपाळ (श्री. ज. जोशी, संक्षिप्तीकरण – आसावरी काकडे), वडाच्या झाडाखाली (आर. के. नारायण), गांधी भारतात येण्यापूर्वी (रामचंद्र गुहा), ग्रेटाची हाक (अतुल देऊळगावकर), शोध स्वामी विवेकनंदांचा (दत्तप्रसाद दाभोळकर), र. धों. कर्वे संच (रघुनाथ कर्वे, संपादन – डॉ. अनंत देशमुख), लव्ह इन टाइम ऑफ करोना (आठ लेखक, आठ कथा), एक होता काव्‍‌र्हर (वीणा गवाणकर), वाचता वाचता (गोविंद तळवलकर), युद्ध जिवांचे (गिरीश कुबेर), ग्रहण (नारायण धारप).