पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे येत्या एक मे पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेमध्ये केली. शहरामध्ये सध्या १५ टक्के पाणीकपात करण्यात येत असून, त्यामध्ये एक मे पासून आणखी दहा टक्के वाढ करून एकूण २५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धरणांमध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. पवना धरणामध्ये केवळ ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे एक मे पासून शहरात २५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचे दोन भाग निश्चित करण्यात येऊन त्यांना आलटून पालटून सम आणि विषम तारखेला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे राजीव जाधव यांनी सांगितले. पाणीपुरवठ्याचे तपशीलवार वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.