एक लाख घरे पडून; सुमारे तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प

पुणे : करोना प्रादुर्भावाचा फटका स्थावर मिळकत व्यवसायाला बसला असून पुण्यात घरभाडय़ामध्ये २५ ते ३० टक्क्यांची घट झाली आहे. कमी रक्कम स्वीकारण्याची घरमालकांची तयारी नसल्यामुळे शहरात एक लाख घरे पडून आहेत. यामध्ये सुमारे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

गेल्या सहा महिन्यांत झालेले बदल स्वीकारणे सर्वसामान्यांना अवघड झाले असून रियल इस्टेट क्षेत्राला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. जागतिक मंदीने बांधकाम क्षेत्र प्रभावित झाले असताना करोनामुळे या क्षेत्राला घरभाडय़ामध्ये झालेल्या कपातीची झळ बसली आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर जागतिक शैक्षणिक केंद्रबिंदू झाले आहे. त्यामुळे देशातून आणि परदेशातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा उपयोग मगरपट्टा, हिंजवडी, खराडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना होतो. माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिकीरणामुळे अनेकजण पुण्यात भाडय़ाने घर घेऊन राहणे पसंत करीत होते.  गेल्या दहा वर्षांत घरभाडय़ाचा दरही वधारला. पाच वर्षांपूर्वी दरमहा सहा हजार रुपयांमध्ये मिळणाऱ्या घरासाठी आतापर्यंत नऊ ते साडेनऊ हजार रुपये द्यावे लागत होते. हेच प्रमाण हिंजवडी, बालेवाडी, बाणेर भागामध्ये अधिक होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत शाळा-महाविद्यालये बंद असून अनेक कंपन्यांनी घरातूनच काम सुरू केले आहे. त्यामुळे घरभाडय़ाच्या रकमेमध्ये २५ ते ३० टक्क्यांची कपात झाली आहे. ती स्वीकारण्याची मानसिकता घरमालकांची नसल्याने पुण्यातील घर भाडय़ाने देण्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटस ,पुणे संस्थेचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी दिली.

वाद सोडविण्यासाठी पुढाकार

९९ एकर आणि नो ब्रोकर यांसारख्या कंपन्या घरमालकांना ग्राहक मिळवून देतात. यामध्ये वादविवाद झाले तर या कंपन्या मालकांना वाद सोडवण्याची सेवा देत नाहीत. अशा परिस्थितीत रियल इस्टेट एजंट्सने घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये समेट घडवून विषय मार्गी लावले आहेत, असे सचिन शिंगवी यांनी सांगितले.

पुण्यामध्ये केवळ घर भाडय़ाने देण्याचा व्यवसाय ठप्प झाल्यामुळे सुमारे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. पण, त्यावर अवलंबून असलेले मेस, अभ्यासिका, विद्यार्थी वाहतूक करणारी व्हॅन असे जवळपास १२ ते १५ पूरक व्यवसायही ठप्प झाले आहेत.

– सचिन शिंगवी, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटस, पुणे